अवैध दारू व्यवसायाला सुरू ठेवण्यासाठी मागितली होती 36 हजाराची लाच.
चद्रपूर/गोंडपिंपरी प्रतिनिधी :-
जिल्ह्यात दारूबंदी उठविल्या नंतर सुद्धा खेडोपाडी आजही अवैध दारू विक्री जोमात असून पोलिसांची हप्ते वसुली पण जोमात असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे, अशातच अवैध दारूविक्री सुरू ठेवण्यासाठी लाच मागणाऱ्या जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील लाठी उपपोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षकासह पोलिस शिपायाला चंद्रपुर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 29 हजार 500 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे.
सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद पारडकर, शिपाई संजू रतनकर असे लाचखोर पोलिसांचे नाव असून गोंडपीपरी तालुक्यातील लाठी परिसरात अवैध दारु विक्री सुरू ठेवण्यासाठी लाठी येथील काही पोलीस कर्मचारी 18 हजार रुपये महिना देण्यासाठी पैशाचा तगादा लावत होते. व दोन महिन्याचे 36 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला दिली.
हप्ता मागणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून 29 हजार 500 रुपयांची लाच घेताना अटक केली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.