ताडोबा अभयारण्यात फिरायला आलेल्या पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला हा थरार.
विशेष प्रतिनिधी :-
आजवर वाघाने गावकरी,गुरे ढोरे चारणार्या व जंगलात गेलेल्या महिला पुरुषांना लक्ष करून त्यांचा जीव घेतला अशा बातम्या ऐकल्या मात्र कर्तव्यावर असणाऱ्या कुण्या वन कर्मचाऱ्यांचा जीव वाघाने घेतल्याच्या घटना कदाचितच घडल्या मात्र काल ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कर्तव्य बजावत असताना स्वाती ढुमणे (३८) या महिला वनरक्षकावर माया वाघिणीने हल्ला चढवून जागीच ठार केल्याची खळबळजनक घटना घडल्याने आता वन कर्मचारीच सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य जनतेचे काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
ताडोबा अभयारण्यात ही थरारक घटना शनिवारी सकाळी ७ वाजता कोलारा वनपरिक्षेत्रात गेटपासून ४ कि.मी. अंतरावर घडली. विशेष म्हणजे, पर्यटकांच्या डोळ्यांदेखत हा थरार घडला. ताडोबात वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर पहिल्यांदाच वाघाचा असा हल्ला झाला आहे. स्वाती ढुमणे तीन वनमजुरांसह त्यावेळी जंगलात वाघांचे चिन्ह सर्वेक्षण (ट्रॉन्झिट लाइन सर्व्हे) करीत होत्या. कक्ष क्रमांक ९७ मध्ये सुमारे २०० मीटरवर त्यांना माया वाघीण दिसली. वाघिणीला बघून त्यांनी आपला मार्ग बदलला. मात्र, काही वेळातच अचानक वाघिणीने स्वाती यांच्यावर हल्ला चढविला व जंगलात फरपटत नेले. ही बाब कळताच वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून शोध घेतला असता, स्वाती यांचा मृतदेहच आढळून आला.
या घटनेनंतर लगेच सर्व्हे थांबविण्यात आला, अशी माहिती व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. वनविभागाच्या वतीने पती संदीप सोनकांबळे यांना पाच लाख दहा हजारांची तातडीची मदत देण्यात आली. त्यांना चार वर्षांची आरुषी नावाची मुलगी आहे. स्वाती ताडोबातील पहिल्या वन शहीद ठरल्या आहेत.