काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेश पुगलीया यांची मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजकीय तक्रार.
चंद्रपूर प्रतिनिधी :-
चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असून, आजवर येथे उद्योगाला पोषक असेच वातावरण राहिले आहे. मात्र, सत्ताधारी मंत्री आपल्या पदाचा दुरूपयोग करीत जिल्हा पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला हाताशी धरून उद्योगांमध्ये दहशत पसरवित आहे.
कंत्राटी कामगारांना आमिष दाखवून कंपनीला अडचणीत आणण्याचे प्रयत्न करीत आहे. या वातावरणाला कंटाळून अल्ट्राटेक सिमेंट कंपनी लवकरच ‘लॉक आऊट’ करण्याची शक्यता असल्याने या उद्योगातील शेकडो कामगारांवर उपासमारीची पाळी येऊ शकते. त्यामुळे ही कंपनी बंद होण्यापासून वाचवा, असे आवाहन काँग्रेसचे माजी खासदार तथा कामगार नेता नरेश पुगलिया यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केले आहे.
या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, अंबूजा सिमेंट, एसीसी सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट या उद्योगामध्ये मान्यताप्राप्त युनियनच्या माध्यमातून अनेक वर्षापासून लोकशाही पध्दतीने कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न होत असताना आणि या सिमेंट उद्योगातील ठेकेदारी कामगारांना आजरोजी 16000 ते 17000 रुपये प्रतिमहिना मिळत असताना, त्यांना 21000 ते 22000 रुपये म्हणजे प्रत्येकी 5000 ते 6000 रुपये महिना पगारवाढ करून देतो, असे आमिष दाखवण्यात येत आहे. परंतु, सिमेंट कंपनीतील कामगार हे राज्य सरकारच्या अख्त्यारित येत नसून, केंद्र सरकारच्या कामगार कायद्यांतर्गत ‘लेबर डिपार्टमेंट सेंट्रल गर्व्हरमेंट’ यांच्या अख्त्यारित आहे. त्यामुळे ही ठेकेदारी कामगारांची दिशाभूल आहे. चंद्रपूर जिल्हयात सिमेंटचे 5 मोठे उद्योग असून, प्रतीदिन जवळपास 47 हजार टन (9 लाख सिमेंट पोती) उत्पादन होत आहे. चांगल्या चालणार्या उद्योगांना अडचणीत आणण्याचे हे काम असल्याचाही आरोप पुगलिया यांनी केला आहे.
मागील 7 दिवसापासून अल्ट्राटेक सिंमेट कंपनीमध्ये मूठभर कामगारांना हाताशी धरून औद्योगिक शांतता भंग केली जात आहे. त्या भागातील पोलिसांची मूक संमती असल्यामुळे हतबल व्यवस्थापनाने आता न्यायालयात धाव घेतली आहे. 14 डिसेंबर 2021 रोजी चंद्रपूर जिल्हा यांनी कामगारांना तसेच अधिकार्यांना कंपनीचे परिसरात जाण्याकरिता अडथळा न करण्याचे तसेच कंपनीचे ट्रक हे कंपनीच्या परिसरात जाण्यापासून न रोकण्याबाबतचे आदेश पारित केले आहे. मात्र, पोलिसच आता या आदेशाची अंमलबजावणी करीत नाहीत आणि संबंधित आंदोलक जबरदस्तीने ‘पॉवर प्लाँट’ बंद करणे, सिमेंट मिल बंद करणे, रॅक लोडींग-अनलोडींगला आडकाठी आणणे आदी काम करीत आहे. याबाबतच्या तक्रारी कंपनीतील ठेकेदारांनी व कंपनीने पोलिसातसुध्दा दिल्या आहेत. अनेक ठेकेदारांच्या तक्रारीसुध्दा पोलिस विभागाने घेतलेल्या नाहीत, असाही आरोप पुगलिया यांनी केला आहे. असे वातावरण असल्यास अल्ट्राटेक सिमेंट कंपनी लवकरच ‘लॉक आऊट’ करण्याची शक्यता असल्याने आपण यात हस्तक्षेप करावा व जिल्हयातील या प्रकारावर आळा घालावा, अशी अपेक्षासुध्दा पुगलिया यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.