मुंबई पुणे नाशिक ठाणे या मुख्य महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला मजबूत करण्यासाठी रणनीती
मुंबई न्यूज वार्ता -:
आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून आगामी मुंबई पुणे नाशिक ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजसाहेब ठाकरेंनी एमआयजी क्लब येथे शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनिती ठरविण्यात आली आहे.
येणाऱ्या महापालिकेत मनसेचे जास्तीत जास्त नगरसेवक असावे यासाठी राजसाहेब ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे. त्यासाठी त्यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत पक्षातील नेते, सरचिटणीस आणि शहराध्यक्ष हजर होते. तर काही दिवसांनी पुन्हा एक बैठक आयोजित करून लगेच मुंबईत राजसाहेब ठाकरे मोठी सभा घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान येत्या काळात विभागवार बैठका घेण्याचे आदेश त्यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पुढे आली आहे.
राज्यातील आगामी महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने आतापासूनच जोरदार तयारी करत आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी याआधीच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी मध्यंतरी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. राजसाहेब ठाकरे काही दिवसांपूर्वी औरंगाबाद दौऱ्यावर गेले होते. तसेच त्यांनी पुण्याचाही दौरा केला होता. राजसाहेब ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. मनसे पक्ष वाढवता येईल यासाठी महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे आगामी काळात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही जाणार आहेत.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनि वेग धरला आहे. यातच सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून वाद निर्माण होताना दिसत आहे. आता मालाडमधील मैदानाला टिपू सुलतानाचे नाव देण्यावरून मुद्द्यावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी मालाडमध्ये क्रीडा संकुलाच्या बाहेर प्रचंड गदारोळ बघायला मिळाला होता. नामकरणाच्या मुद्द्यावरुन भाजपचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.