महिला पोलीस उपनिरीक्षक बनल्या एक दिवशीय ठाणेदार तर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सांभाळले कार्यालयीन कामकाज.
वरोरा प्रतिनिधी :-
पोलीस प्रशासनात महिलांना फार मोठे स्थान नसते कारण महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची संख्या नगण्य असते पण जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वरोरा पोलीस स्टेशन मधे या विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या संकल्पनेतून वरोरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार काचोरे यांच्या ऐवजी महिला पोलीस उपनिरीक्षक तांदूळकर यांना ठाणेदार म्हणून कार्यभार सांभाळण्याची संधी देण्यात आली तर उर्वरित कार्यालयीन कामकाज बघण्याची प्रमुख जबाबदारी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आली. या प्रसंगी घेतलेल्या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस अधीक्षक नोपानी यांनी महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचेसह पोलीस निरीक्षक अमोल काचारे, सहायक पोलीस निरीक्षक राजकीरन मडावी. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल किटे. पोलीस उपनिरीक्षक वर्षा तांदूळकर पोलीस उपानिरीक्षक सचिन मुसळे, किशोर मित्तलवार व इतर महिला व पुरुष पोलीस कर्मचारी यांच्यासह मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, जेष्ठ पत्रकार प्रवीण खिरटकर, बाळू भोयर, राजेश मर्दाने, लखन केशवानी व इतर पत्रकार उपस्थित होते. महिलांना एक दिवस पोलीस स्टेशन मधे मानाचे स्थान देण्यात आल्याने या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला होता.
दरम्यान पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री – पुरुष विषमतेचे एक उदाहरण म्हणजे जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नव्हता आणि या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या.
१९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यामध्ये ‘क्लारा झेटकिन’ या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने ‘सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे’ अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली.
८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ८ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ म्हणून क्लाराने मांडलेला ठराव पास झाला.
भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने ‘जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया ‘बोलत्या’ व्हायला लागल्या.