अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना १ जुलैपासून लागू केली आहे. या योजनेची प्रभावी व सुलभ अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने योजनेची व्याप्ती वाढवली असून, यासाठी १२ जुलैला नवीन शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार यशस्वी पात्र लाभार्थीची नोंद झाल्यानंतर नोंदणी करणाऱ्या घटकांना ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
राज्य शासनाने १२ जुलैला जारी केलेल्या नवीन शासन निर्णयानुसार, पात्र महिलेचे अर्ज भरण्यासाठी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका व अंगणवाडी सेविका, एनयूएलएम यांचे समूह संघटक (सीआरपी), मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेत सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना शासनाने प्राधिकृत केले आहे. त्यांनी नोंदणी केलेल्या अर्जापैकी ज्या महिला लाभार्थीची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर योजनेसाठी पात्र ठरतील. त्यांच्या संख्येप्रमाणे प्रती पात्र लाभार्थी याप्रमाणे ५० रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे.
जिल्ह्यात १४ जुलै पर्यंत एकूण २६ हजार ५४७ महिलांनी अर्ज केले आहेत. १२ हजार ९३८ महिलांनी ऑनलाइन तर १३ हजार ६०९ महिलांनी ऑफलाइन अर्ज केले आहेत. यामध्ये वर्धा तालुक्यातील ४ हजार ८९१, सेलू तालुक्यातील २ हजार ७२१, देवळी तालुक्यातील २ हजार २०४, समुद्रपूर तालुक्यातील २ हजार ७१, हिंगणघाट तालुक्यातील १ हजार ९५१, आर्वी तालुक्यातील ४ हजार २०९, आष्टी तालुक्यातील १ हजार ८४६, कारंजा तालुक्यातील १ हजार १९८ व शहरी भागातील ५ हजार ४५६ महिलांनी नोंदणी केली आहे.