Home Breaking News ओला दुष्काळ जाहीर करण्यात चंद्रपूरचा अपमान – दिनेश चोखारे यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीची...

ओला दुष्काळ जाहीर करण्यात चंद्रपूरचा अपमान – दिनेश चोखारे यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीची मागणी

ओला दुष्काळ जाहीर करण्यात चंद्रपूरचा अपमान – दिनेश चोखारे यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीची मागणी

चंद्रपूर :-  राज्यातील अनेक जिल्ह्यांना महायुती सरकारने नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, या घोषणेमधून चंद्रपूरसारखा अतिप्रभावित जिल्हा वगळण्यात आल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व निराशा पसरली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे भुईमूग, सोयाबीन, कापूस, धान या प्रमुख पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

 

पाण्याच्या पुरामुळे हजारो एकर शेती वाहून गेली, अनेक शेतकऱ्यांची घरे कोसळली, जनावरांचा चारा नष्ट झाला आणि शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून कर्जबाजारीपणाला सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने त्यांची उपजीविकाच धोक्यात आली आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश दादाजी चोखारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत व दिलासा देण्याची मागणी केली आहे.

निवेदनातील  मागण्या:

चंद्रपूर जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत, कर्जमाफी व तातडीची सानुग्रह मदत द्यावी. शेतीपयोगी साधनसामग्रीचे नुकसान भरून काढण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे. घरे कोसळलेल्या शेतकऱ्यांना निवारा व घरबांधणीसाठी अनुदान द्यावे. जनावरांचा चारा व पशुखाद्य पुरवठा करण्यात यावा.

चोखारे यांनी आपल्या निवेदनात स्पष्टपणे सांगितले की, “शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी सरकारने पक्षभेद बाजूला ठेवून निर्णय घ्यावा. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जर शासनाने वेळेवर मदत दिली नाही, तर ही आपत्ती सामाजिक संकटात बदलू शकते.”

निवेदनाची प्रत राज्याचे कृषी मंत्री, मदत व पुनर्वसन विभाग, आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या बाजूने शासनाने उभं राहावं, अशी ठाम मागणी चोखारे यांनी केली आहे.