पत्रकार दिन विशेष :-
६ जानेवारी १८३१ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र चालू केले. या पार्श्वभूमीवर ६ जानेवारी हा दिवस राज्य शासनातर्फे ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.
पत्रकारिता हा शब्द आता जणू सवेंदना हरवलेला शब्द वाटायला लागला आहे. कारण पूर्वीची ध्येयवादी पत्रकारिता आज राहिलेली नाही, हे वृत्तपत्रातील लेखनातून व टी वी न्यूज चैनेल च्या माध्यमातून सहज दिसून येते. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात वृत्तपत्रांचे फार मोलाचे स्थान आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा जोतिबा फुले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, नाटय़ाचार्य कृ. प्र. खाडिलकर अशा अनेक मंडळींनी ब्रिटिशांच्या विरोधात जनजागृती व आक्रोश निर्माण करण्यासाठी वृत्तपत्रांचा खूप चांगल्या प्रकारे वापर करून घेतला. त्यावेळचे या पत्रकार नेत्यांचे लेख वाचण्यासाठी वृत्तपत्रांवर वाचकांच्या उडय़ा पडत होत्या.खरं तर संपादक हा वृत्तपत्राचा कणा असतो. वृत्तपत्रात येणा-या सर्व प्रकारच्या मजकुराला हाच जबाबदार असतो. त्याच्या लेखनामध्ये समाजमन बदलण्याची शक्ती असते.पण आताचे संपादक हे आपल्याला जाहिरात कोण देणार? किती पैसे जाहिरातीत मिळणार याचे समीकरण जुळवून जाहिरातदाराच्या हिताच्या बातम्या प्रकाशित करताना दिसत आहे.
स्वातंत्र्याचा लढा कोणी गाजवला असेल तर तो त्या काळातील वर्तमान पत्रातील अग्रलेखानी, तुमचे डोके ठिकाणावर आहे का ? असे इंग्रज सत्तेला प्रश्न विचारणारे लेख आता मात्र लोप पावले आहे आणि सरकारी जाहिरात मिळावी म्हणून सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यापेक्षा सरकारचा उदो उदो आता बघायला मिळत आहे, खरं तर स्वातंत्र्यानंतर १९७० पर्यंतचा भारतीय पत्रकारितेचा काळ हा विकसनशील पत्रकारितेचा काळ मानला जातो. प्रसिद्धीची, छपाईची साधने नसताना, वितरण व्यवस्था नसतानाही त्या काळी जास्तीत-जास्त वाचकांपर्यंत वर्तमानपत्र पोहोचवण्याची संपादकांची सतत धडपड असे. कार्यकर्ते हेच संपादक असल्याने समाजाचे वास्तव चित्र वृत्तपत्रात पाहायला मिळे. वृत्तपत्रावर वाचकांचा खूप विश्वास होता. वृत्तपत्रात बातमी आली म्हणजे, ती शंभर टक्के खरी असणारच अशी श्रद्धा समाजात होती. वृत्तपत्रात व्यक्तीचे नाव प्रसिद्ध होणे हे समाजात फार मोठे अप्रूप होते, छायाचित्रासाठी शिष्याचे ब्लॉक बनवावे लागत. ते काम खर्चिक असल्याने वृत्तपत्रात फोटो फार कमी प्रसिद्ध होत होते.त्यामुळे पाने भरण्यासाठी मजकुराला अधिक स्थान मिळे. त्यामुळे विविध लेखन प्रकाराचा, शुद्धलेखनावर अधिक लक्ष असलेला, दर्जेदार मजकूर देण्याची संपादकांची धडपड चाले. वृत्तपत्रात लेखन करणा-यांना समाजात अधिक मान असे. वृत्तपत्र हे एक ध्येय म्हणून चालवले जात असे. आज ही परिस्थिती राहिलेली नाही. आज वृत्तपत्र हे एक धंदा म्हणून चालवले जाते. बदलत्या काळात त्यात काही चुकीचे आहे, असे म्हणता येणार नाही. कारण, वृत्तपत्रातून काही उत्पन्न मिळाले नाही, तर वृत्तपत्राचा खर्च कसा भागवायचा? कर्मचा-यांचे पगार कोठून द्यायचे, असा प्रश्न निर्माण केला जातो. पण त्यालाही काही मर्यादा असतात ज्या पूर्वी त्या होत्या. पण आजची पत्रकारिता ही व्यवसायिक झाली असल्याने “वर्तमानपत्र हे समाज मनाचे आरसे असतात” ही बाब मात्र जणू पत्रकारितेत गायब झाल्याचे चित्र आहे. या व्यवसायाकडे अलीकडे फक्त अर्थार्जन म्हणूनच पहिले जात असल्याने नीतिमत्ता राहिलेली नाही. विश्वासार्हता संपुष्टात आली. या सर्वातून ‘पाकीट पत्रकारिता’ निर्माण झाली. जाहिराती मिळवण्यासाठी भल्या-बु-या मार्गाचे लेखन सुरू झाले. निवडणुका किंवा मोठे कार्यक्रम यांच्या बातम्यांना काही प्रमाणात पीतपत्रकारितेचे स्वरूप प्राप्त झाले. निवडणुकीच्या काळात तर काही राजकीय पक्षांनीच बांधून घेऊन त्यांच्या प्रचाराचे काम घेतले जाते. यामुळे राजकीय स्वरूपाचे वास्तव चित्र वाचकाला मिळेनासे झाले. यातून वृत्तपत्रांची म्हणण्यापेक्षा त्यांच्या मालकांची आर्थिक बाजू भक्कम होऊन संपादकांचे लेखन, विचार स्वातंत्र्य संपुष्टात आले. ते सांगकामे बनले. या सर्व परिस्थितीने वृत्तपत्रापासून दर्दी, वाचनाची आवड असणारा जिज्ञासू वाचक दूर झाला.
आज इंग्रजी वृत्तपत्रे त्यामानाने बरी निघतात. पण, मराठी वृत्तपत्रांचे दिवस मात्र खराबच म्हटले पाहिजेत. कारण संपादकांना पूर्वीसारखे लेखन स्वातंत्र्य नाहीच. पण, मालकांनी दिलेले जाहिरातीचे ‘टार्गेट’ पूर्ण करावे लागते. त्यामुळे त्यांना स्वत:लाही नि:पक्षपातीपणे लेखन करता येत नाही. आपल्या वार्ताहरांची व्यावसायिक नीतिमत्ता जपणे कठीण जात आहे. जो जास्त जाहिराती आणतो, त्याला वृत्तपत्रात मानाचे स्थान मिळते. अनेक पुरस्कारांनी गौरवले जाते. पत्रकार म्हटला, तर किमान बातमी तरी समजली पाहिजे? लिहिण्याचे कसब सर्वानाच असते असे नाही, पण त्याने दिलेला मजकूर वाचकाला समजायला हवा. पूर्वी अनुभवातून पत्रकार-लेखक तयार होत होते ती परिस्थिती आता राहिलेली नाही कारण आता एवढे पत्रकार झाले की नेमका पत्रकार कोण ? याचा शोध घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
आजच्या स्थितीत पत्रकारितेचे महाविद्यालयातून उच्च शिक्षण मिळण्याची सोय झाल्याने मोठय़ा प्रमाणावर पत्रकार तयार होत असतात, पण त्यांना वाचन, अनुभव आणि जनसंपर्क नसेल, तर तो वृत्तपत्रात दर्जेदार लेखन करू शकत नाही. स्वत: जबाबदारीने लेखन करायचे, तर किमान पाच वर्तमानपत्रे आणि १० वेबसाईट पाहायला हव्यात. आठवडय़ातून किमान एकतरी पुस्तक वाचायला हवे. त्यामुळे शब्दसंग्रह वाढतो. पूर्वी संपादक व्यक्तीच्या नावाने वृत्तपत्र ओळखले जायचे. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आता तर एक वर्षातच वृत्तपत्रात नवीन संपादक दिसतो.
आजच्या डिजिटल युगात खासगी वृत्तवाहिन्यांचा सध्या खूप बोलबाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे वर्तमानपत्रात, वृत्तवाहिन्यांत सर्वभाषिक तरुण पत्रकारांची संख्या मोठी असली तरी नेमक्या कोणत्या बातम्या द्यायच्या. लाइव्ह बातम्या देताना बोलताना, प्रश्न विचारताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे, याचा अनेक पत्रकारांत अभाव दिसतो. सध्या क्रुषि विधेयक दुरुस्ती कायद्याच्या विरोधात दिल्लीत जनआंदोलन सुरू आहे. त्यात काही हिंसक वातावरण निर्माण झाले. अशावेळी टीव्हीवर कोणती दृश्ये दाखवायची, याचे भान राखले जात नाही. नव्हे केंद्र शासनाच्या दबावाखाली प्रसारमाध्यमे आहेत, मागे लाईन देताना एका वृत्तवाहिनीने सर्वधर्मीयांचा प्रचंड मोर्चा या वाक्याऐवजी स्वधर्मीयांचा प्रचंड मोर्चा, अशी लाईन दिली. ती ब-याच वेळा दाखवली गेली. ‘लाईव्ह’ कार्यक्रमात लेखन नसले तरी भाषेच्या शुद्ध-अशुद्धतेवर लक्ष देणे फार जरुरीचे आहे. त्याचप्रमाणे कोणत्या विषयाला आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्त्व द्यायचे, हे वाहिनीच्या संपादकाला समजणे गरजेचे आहे. ते समजले नाही, तर तो राजकीय चर्चेचा विषय होतो.पण आजची प्रसारमाध्यमे ही प्रायोजित असल्यामुळे या प्रसारमाध्यमांवर जनतेचा विश्वास उडाला असल्याची परिस्थिती दिसत आहे.
एकीकडे राष्ट्रीय पत्रकारितेत व्यवसायाचे स्वरूप आले असले तरी मराठी पत्रकारितेत आजही इमानदार व अभ्यासू लोक आहेत, पण त्यांना नव्या पिढीशी जवळीक साधण्याचा, त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करताना ते दिसत नाहीत. त्याचप्रमाणे नव्या पिढीलाही त्यांचे मार्गदर्शन घ्यावेसे वाटत नसल्याने, मीच श्रेष्ठ पत्रकार ही वृत्ती या क्षेत्रात वाढत आहे. यामुळे आज पत्रकारितेचे खच्चीकरण होत असून, वृत्तपत्रात किंवा वाहिन्यांत व्यवसायिक पत्रकारांची संख्या वाढत आहे. महत्वाची बाब म्हणजे आता पत्रकार संघटनातही राजकारण शिरलेले दिसते. उच्चपदे किती वर्षे आपल्याकडे ठेवता येतील, त्यातून व्यक्तिगत लाभ घेता येतील, यासाठी काही पत्रकारांची धडपड सुरू असलेली दिसते. त्यातून राजकीय नेते जरी केवळ एक गरज म्हणून पत्रकारांना जवळ करीत असले तरी, सामान्य वाचक मात्र पत्रकारापासून दूर होत असल्याचे चित्र सध्या पत्रकारितेत दिसत आहे. ही परिस्थिती बदलणार नाही का ? आपण दरवर्षी पत्रकार दिवस साजरा करताना या विषयी विचार मंथन कधी करणार ? या व अशा अनेक प्रश्नात अडकलेली घातक पत्रकारिता ही खरोखर समाजाच्या उत्थानासाठी एक क्रांतिकारी मशाल व्हावी हीच दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्म्रुतीदिनी आशा आणि अपेक्षा ……