अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
अद्ययावत तंत्रज्ञानासह तातडीने कार्यवाही करण्याचे ना. सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश
मुंबई, ता. १२ :- भारताच्या स्वातंत्र्य समरात जाज्वल्य राष्ट्रभक्तिने प्रेरित होऊन बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भगूर येथील स्मारक अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करुन नव्या पिढीसाठी स्फुर्तीस्थळ व्हावे, यासाठी वेगाने कार्यवाही सुरू करा असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज अधिकाऱ्यांना दिले. सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित आढावा बैठकीत ना मुनगंटीवार बोलत होते.
बैठकीला सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष श्री रणजित सावरकर, सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्री दिग्पाल लांजेकर, मंजिरी मराठे यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, सांकृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे आदी उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी स्वा. सावरकर यांचा जन्म झाला, “सावरकर वाडा” या घरात त्यांचे बालपण गेले, त्याच घरात भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा संकल्प त्यांनी कुलदेवतेसमोर केला. या वाड्याला महाराष्ट्र शासनच्या पुरातत्व विभागाने स्मारकाचा दर्जा दिला. हे स्मारक आणि या वाड्याच्या भिंती केवळ माती विटांच्या भिंती न राहता त्या वि. दा. सावरकर यांचा जाज्वल्य राष्ट्रभक्तीचा संदेश देणाऱ्या बोलक्या भिंती व्हाव्यात अशी अपेक्षा ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. ना मुनगंटीवार म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी संस्कारित स्वातंत्र्याचा विचार मांडला. २१ व्या शतकात तंत्रज्ञानाचा संपूर्ण उपयोग करुन सावरकरांचा इतिहास नव्या पिढीला दाखविण्यासाठी तज्ञ आणि तंत्रज्ञान याचा संपूर्ण उपयोग करा. भगूर या गावात प्रवेश करताच विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनपट समोर यावा अश्या पद्धतीने काम व्हावे अशा सूचना ना. मुनगंटीवार यांनी बैठकीत दिल्या.