•राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हाप्रतिनिधी
हिंगणघाट :-शहरात अनेक वर्षांपासून आरोग्याबाबत सामान्य नागरिकांची होत असलेली हेळसांड पाहून रुग्णमित्र गजू कुबडे यांनी २४ एप्रिल रोजी उपविभागीय कार्यालयापुढे अनवाणी उन्हात उभे राहून प्रायश्चित्त आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात वैद्यकीय अधिकान्यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे एक लाखावर लोकसंख्या असलेल्या हिंगणघाटात वैद्यकीय सोयी अजिबात नाही. बाहेरून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर उपजिल्हा रुग्णालयाची एक मोठी इमारत शहराची शोभा वाढवत आहे. सोनोग्राफीची मशीन दोन वर्षांपासून बंद आहे. यामुळे या
गावातील गर्भवती महिला तसेच पोटाचे आजार असलेल्या रुग्णांना सोनोग्राफीसाठी सेवाग्राम, सावंगी किंवा नागपूर येथे जाऊन उपचार करावा लागतो.
शहरातील गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांच्या आरोग्याची होणारी हेळसांड थांबावी, यासाठी अनेकदा सक्षम अधिकाऱ्यांना निवेदन देऊन छोटी-मोठी आंदोलनेही केली. उपजिल्हा रुग्णालयासमोर तीन दिवस अन्नत्याग आंदोलनही केले. परंतु, त्याचा कोणताही परिणाम यंत्रणेवर झाला नसल्याने आता २४ रोजी मोकळ्या मैदानात दिवसभर अनवाणी पायाने उभा राहून प्रायश्चित्त आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला असल्याचे त्यांनी सांगितले. 4 (तभा वृत्तसेवा)