अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
बल्लारपूर :- आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील विद्यार्थ्यांना खासगी नामांकित शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. याअंतर्गत बल्लारपूर तालुक्यातील ९९ बालकांना मोफत प्रवेशाची लॉटरी लागली आहे. मात्र, अजूनही ५१ पालकांनी मिळालेल्या शाळा पसंत नसल्याने आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित केला नाही.
अशातच २२ मेपर्यंत प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाल्यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार ‘शिक्षण हक्क’ कायद्यानुसार (आरटीई) आर्थिक व दुर्बल घटकांसाठी २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार बल्लारपूर तालुक्यातील खासगी शाळांची निवड करण्यात आली होती. यामधून १५० जागांपैकी ९९ बालकांचा १८ खासगी शाळांमध्ये प्रवेश झाला आहे.
याबाबतचा एसएमएस त्यांच्या मोबाइलवर आला आहे.परंतु अजूनही अनेकांना प्रवेश मिळाला नसल्यामुळे व प्रवेश घेण्याची तारीख वाढल्यामुळे पालकवर्ग प्रवेश घेण्याकडे वळला आहे.