Home Breaking News रमाई घरकुल योजनेतील 3237 लाभार्थ्यांना मिळणार हक्काची घरे

रमाई घरकुल योजनेतील 3237 लाभार्थ्यांना मिळणार हक्काची घरे

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश

चंद्रपूर  :-  जिल्ह्यातील रमाई आवास घरकुल योजनेचे (ग्रामीण) 3237 लाभार्थ्यांना मंजूरी मिळाली आहे. यामध्ये 1265 त्रुटी असलेल्या घरकुलांच्या प्रस्तावालाही मंजूरी मिळाली असून या सर्व लाभार्थ्यांना हक्काचे घरे मिळणार आहे. यासाठी राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता़ त्यांच्या प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे.

रमाई घरकुल योजना (ग्रामीण) या योजनेअंतर्गत रमाई घरकुल निर्माण समितीची बैठक राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी घरकुल योजना सुरू केली आहे. या अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील लोकांचे राहणीमान उंचावणे, त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यात येते. रमाई आवास योजनेचा लाभ संबंधित लाभार्थ्यांना मिळण्यासाठी सर्व तालुक्यातील पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांच्याकडून पात्र लाभार्थ्यांची यादी मंजुरीकरीता मागविण्यात आली होती.

रमाई आवास योजना (ग्रामीण) करीता सन 2023-24 या आर्थिक वर्षात तालुकानिहाय उद्दिष्ट देण्यात आले. यामध्ये 15 तालुक्यामध्ये एकूण लाभार्थ्यांची संख्या सुरवातीला 1972 होती. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील अनेकांनी या योजनेकरीता अर्ज केले, मात्र घरकुलापासून ते वंचित असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आले. या नागरिकांना घरकुल देण्यासाठी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी स्वत: पुढाकार घेतला. त्यामुळे सुरवातीला रद्द झालले 1265 लाभार्थी रमाई घरकुल योजनेसाठी नव्याने पात्र ठरविण्यात आले. आता जिल्ह्यात एकूण 3237 लाभार्थ्यांना रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.

अशी आहे नव्याने पात्र झालेल्या लाभार्थ्यांची तालुकानिहाय संख्या

मुल तालुक्यामध्ये रद्द ऐवजी पात्र लाभार्थी संख्या 191, जिवती तालुक्यात 24 लाभार्थी, वरोरा 50 लाभार्थी, नागभीड 102, राजुरा 57, गोंडपिपरी 261, ब्रम्हपुरी 7 लाभार्थी, कोरपना 54, सावली तालुक्यात 366, पोंभुर्णा तालुक्यात 33, भद्रावती तालुक्यात 31 लाभार्थी तर बल्लारपूर तालुक्यात 89 लाभार्थी असे एकुण 1265 रद्द ऐवजी पात्र घरकुल लाभार्थ्यांची संख्या आहे.

Previous articleचड्डा ट्रान्सपोर्टचे मालक यांच्या कार्यालय आणि निवासस्थानांवर ‘Income Tax ‘ विभागाचे छापे
Next articleदखलपात्र :- मालवीय वार्डातील प्रस्तावित देशी दारू दुकानाला नागरिकांचा विरोध.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here