राज्य उत्पादन शुल्क विभागाला तक्रार देऊन परवानगी न देण्याची मागणी. 43 नागरिकांच्या सह्याचे निवेदन.
वरोरा प्रतिनिधी :-
जिल्ह्यात दारूबंदी उठल्यापासून दारू दुकाने बिअर बार सुरू करण्याचा व त्याला पैसे घेऊन मंजुरी देण्याचा सपाटा राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरू केला असुन मागेल त्याला शेततळे या शासनाच्या धोरणाच्या धर्तीवर मागेल त्याला दारूचे दुकान हे नवे धोरण राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवलंबले असल्याने जो तो दारू दुकानाच्या भानगडीत पडत आहे. दरम्यान शहरातील मालवीय वार्डात एक देशी दारू विक्री करणाऱ्यांचं दुकान थाटलं जाण्याची शक्यता लक्षात घेता मालवीय वार्डातील नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक यांना निवेदन देऊन सदर देशी दारू दुकानाला परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे.
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती समोर असलेल्या जागेवर देशी दारू दुकान उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या परंतु सदर प्रस्तावित देशी दारूच्या दुकानाला परवानगी मिळाल्यास येथील वार्डात राहणाऱ्या नागरिकांवर व शाळेच्या मुलंमुली यांच्यावर या देशी दारू दुकानात येणाऱ्या दारुड्याचा वागण्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळं या भागातील नागरिकांनी सर्व क्र १९६/२ पैकी प्लॉट क्र ४२ माँजा खांजी येथे सुरू होत असलेले देशी दारू दुकानाला परवानगी देऊ नये अशी मागणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जगताप यांच्याकडे केली आहे. यावेळी जवळपास 43 नागरिकांच्या सह्याचे निवेदन सोपविण्यात आले. दरम्यान आता या ठिकाणी देशी दारू दुकान उघडले जाणार की त्याला परवानगी नाकारणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.