परप्रांतिय व धर्मातरण केलेल्यांनी मूळ आदिवासींच्या जागा हडप केल्याचा हल्लाबोल.
नागपूर (प्रतिनिधी):-
क्षेत्रबंधन कायदा १०८/१९७६ हा केंद्र सरकारने पारीत केला, पण महाराष्ट्रातील विस्तारीत क्षेत्रातील लोकसंख्येच्या बळावर आदिवासींचे २५ आमदार व ४ खासदार निवडून आलेत. महाराष्ट्रातील मुल आदिवासींच्या ६१ लाख लोकसंख्येचा फायदा घेवून जे १४ बोगस आदिवासी आमदार व दोन खासदार झालेत. ‘त्यां’ना अगोदर हटवा. जर राज्यातील 33 जमाती ‘बोगस’ असतील तर ४० वर्षे त्यांच्या लोकसंख्येच्या आधारे आलेल्या हजारो कोटींच्या निधीची ‘कॅग’कडून चौकशी करा तसेच आदिवासी विभागातील ६५०० कोटीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, अशा खळबळजनक मागणीचा पुनरूच्चार ऑफ्रोहचे कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते यांनी केला.
14 डिसेंबर 2022 च्या शासन निर्णयाचे शुद्धीपत्रक काढा , सेवेत घेतलेल्या करूणा भानुसे यांची वेतननिश्चिती करून वेतन सुरू करा. या व इतर मागण्यांसाठी ‘ऑफ्रोह’चे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर, महासचिव रूपेश पाल ,ज्ञानेश्वर बारापात्रे व महिला आघाडीच्या सदस्या करुणा लिखार यांनी दि.10/11/2023 पासून नागपूर येथील संविधान चौकात आमरण उपोषण सुरू केले आहे.
दोन दिवसापूर्वी संविधान चौकातील उपोषणकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी ऑफ्रोह राज्यभरातून विविध पदाधिका-यांनी उपोषण स्थळी धाव घेतली.त्यावेळी उपस्थित समाजबांधवांना व कर्मचा-यांना मार्गदर्शन करताना राजेश सोनपरोते बोलत होते. ते पुढे म्हणाले कि गेली ५० वर्षे अनुसूचित क्षेत्रातील लोकप्रतिनिधी हे विस्तारीत क्षेत्रातील ६१ लाख लोकांना जातप्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळू नयेत, असे षडयंत्र रचून अन्याय करीत आहेत. बहिरा केसचा निकाल फक्त २२ लोकांसाठी मर्यादित असतांना याच लोकप्रतिनिधींनी हा निकाल विशिष्ठ जमातींना लागू करावा, असा दबाव शासनावर आणल्याचीही चिंता त्यांनी व्यक्त केली. याच लोकप्रतिनिधींनी जातप्रमाणपत्र तपासणी समितीवर दबाव टाकून अस्सल जातीचे प्रमाणपत्र ‘अवैध’ केलेत. ज्यांचे जातप्रमाणपत्र ‘अवैध’ केलेत त्या समूहांना ‘बोगस’ ठरवण्याचे कटकारस्थान रचले! अनुसूचित क्षेत्रातील धर्मांतरण केलेल्या बऱ्याच आदिवासींनी महाराष्ट्रात आदिवासींची फायदे लाटले,असा आरोपही सोनपरोते यांनी केला.
यावेळी ऑफ्रोह राज्य कार्यकारिणीचे सहसचिव डाॅ.अनंत पाटील,ऑफ्रोह महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सौ.रूक्मिणी धनी ,जालना जिल्हाध्यक्ष जितेंद्र कुंडीले, नागपूर जिल्हाध्यक्ष दामोदर खडगी,यवतमाळ जिल्हाध्यक्ष मोरेशवर लिखार,पुणे विभागीय अध्यक्ष अभय जगताप जिल्हाध्यक्ष संजय नाईकवाडी,अमरावतीचे जिल्हाध्यक्ष यशवंत वरूडकर,वाशिमचे जिल्हाध्यक्ष देवानंद हेडावू,भंडाराचे जिल्हाध्यक्ष मंगेश नंदनवार यांच्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यातील ‘ऑफ्रोह’चे विविध पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.