तिरवंजा येथील अवैध गौण खनिज उत्खनन बाबत मोजणी केल्यानंतर सुद्धा भद्रावती तहसीलदार मौन का?
चंद्रपूर :-
काही दिवसांपूर्वी काँगेस नेते शामकांत थेरे यांचा अवैध गौण खनिज वाहतूक करणारा हायवा ट्रक उपविभागीय अधिकारी यांनी पकडल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती व या घटनेची सर्वत्र प्रसारमाध्यमांतून मोठी चर्चा झाल्याने शामकांत थेरे यांची काँग्रेस कमेटीच्या चंद्रपूर तालुका अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती, दरम्यान प्रशासनाच्या कारवाई चा बडगा थेरे यांच्यावर आल्याने त्यांनी काही उठाठेव केली, परंतु त्या प्रसारमाध्यमांनी हा विषय रेटून धरल्याने शेवटी या प्रकरणात मौजा तिरवंजा परिसरातील महसूल च्या जागेवरून मोठ्या प्रमाणात जे अवैध गौण खनिज उत्खनन करून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा राजस्व बुडविला जातं होता त्यांचे मोजमाप करण्यात आले, परंतु या प्रकरणी शामकांत थेरे यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांच्या मशीन व ट्रक जप्तीची कार्यवाही होत॑ नसल्याने भद्रावती तहसीलदार सोनवणे यांच्यावर संताप व्यक्त होत॑ आहे.
काँग्रेस नेते शामकांत थेरे व भद्रावती तहसीलदार सोनवणे यांचे अर्थपूर्ण हितसंबंध असल्याने मौजा तिरवंजा परिसरातील जवळपास एक किलोमीटर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन राजरोसपणे सुरू होते व शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल चक्क बुडवला जातं होता, दरम्यान थेरे यांचा एक अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणारा ट्रक चंद्रपूर उपविभागीय अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी पकडला व कोट्यावधी रुपयांच्या अवैध गौण खनिज उत्खनन करणारी शामकांत थेरे व त्यांच्या सहकाऱ्यांची टोळी प्रकाशात आली. शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविल्या प्रकरणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यासह उपविभागीय अधिकारी वरोरा व तहसीलदार भद्रावती यांना निवेदन देऊन अवैध गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणी शामकांत थेरे व त्यांच्या साथीदारांनी अवैध गौण खनिज उत्खनन केले त्यांचे मोजमाप करून त्याचा दंड वसूल करावा व त्यांच्या जेसीबी पोकलॅन मशीन सह ट्रक जप्त करण्यात यावे व चोरीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली होती.
दरम्यान तिरवंजा येथील अवैध गौण खनिज उत्खनन याचे मोजमाप नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आली, परंतु पुढील कार्यवाही अजूनही गुलदस्त्यात असुन शामकांत थेरे व त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल कधी होणार व त्यांच्यावर दंडाची कार्यवाही होऊन त्यांनी या कामी वापरलेली जेसीबी व पोकलॅन मशीन सह वाहतूक करणारे हायवा ट्रक जप्त कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.