Home Breaking News जैवविविधता वाचविण्यासाठी लढणारे फॉरेस्ट रेंजर्स खऱ्या अर्थाने समाजातील हिरो

जैवविविधता वाचविण्यासाठी लढणारे फॉरेस्ट रेंजर्स खऱ्या अर्थाने समाजातील हिरो

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

आशिया स्तरावरील पहिल्या रेंजर्स फोरममध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे गुवाहाटीत प्रतिपादन

गुवाहाटी  :-  (आसाम)  दि. 6,पर्यावरण आणि वन्यजीव रक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या वनक्षेत्रपालांमुळे जैवविविधता सुरक्षित असून धनापेक्षा जीवन सुरक्षित करणारे वन श्रेष्ठ आहे हे पटवून सांगण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे यासाठी झटणारे फॉरेस्ट रेंजर्स हे खऱ्या अर्थाने हिरो आहेत असे गौरवोद्गार
महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. गुवाहाटी येथे आयोजित पहिल्या आशियाई रेंजर्स फोरमच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. आशिया खंडातील विविध देशांसह, भारताच्या विविध राज्यातील रेंजर्स या तीन दिवसीय फोरमसाठी उपस्थित झाले होते. यावेळी मंचावर आसामचे वने व पर्यावरण मंत्री चंद्रमोहन पटवारी, आसामचे वनबल प्रमुख एम. के. यादव, एशियन रेंजर्स फोरमचे अध्यक्ष रोहित सिंग, आशिया चे अध्यक्ष ख्रिस ग्लोरिस, वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वन संरक्षक संदीप कुमार उपस्थित होते.

यावेळी ना मुनगंटीवार म्हणाले, जगण्यासाठी श्वास अर्थात प्राणवायू देणाऱ्या जंगलांच्या वाढीची जबाबदारी सर्वांनी मिळून घ्यायला हवी. भारतातील सर्वाधिक वाघ महाराष्ट्रात असून, वनक्षेत्रातदेखील मोठी वाढ गेल्या काही वर्षांत झाली आहे. चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे जागतिक पर्यटकांचा ओढा असतो असे सांगून ना मुनगंटीवार म्हणाले, जैवविविधता नष्ट होणार नाही यासाठी व्यापक प्रयत्न झाले पाहिजे. ते म्हणाले, महाराष्ट्रात अर्थ व वनमंत्री होतो. पर्यावरणाप्रती आपण काही तरी देणं लागतो या भावनेतून अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात वन विभागाचे बजेट वाढविले ,आजच्या घडीला देशातील वन विभागाला सर्वाधिक बजेट महाराष्ट्रात मिळत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख ना. मुनगंटीवार यांनी केला.

यावेळी विशेष कामगिरी करणाऱ्या महिला रेंजर्सना ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
महाराष्ट्राच्या वन विभागातही महिला कार्यरत असून त्यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. 50 कोटी वृक्षालागवड , हॅलो फॉरेस्ट अशा प्रकल्पांच्या माध्यमातून आपण सातत्याने महाराष्ट्रातील वनसंवर्धनासाठी प्रयत्न करीत असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.

गुजरातच्या हिना पटेल, मेघालयाच्या मर्थिलिना संगमा, राजस्थानच्या प्रेमकुंवर सत्तावर, महाराष्ट्राच्या दीपिका वशिष्ठ यांना एक्सप्लोरिंग वुमनहुड फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या वनदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती दीपाली देवकर उपस्थित होत्या.

महाराष्ट्रात मानव-वन्यजीव संघर्षात दिला जाणारा मोबदला आजच्या घडीला देशातील सर्वाधिक आहे.
अगदी पुरातन काळापासून भारतात वन आणि वन्यजीव व्यवस्थापन केले जात आहे. आधुनिक भारतातील रेंजर्स हे व्यवस्थापन करणाऱ्यांपैकी एक आहेत. सिमेवर सैन्याचे जवान देशाच्या संरक्षणासाठी लढा देतात. तर सिमेच्या आत वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी पर्यावरण रक्षणासाठी लढा देतात, असे ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. देशाच्या कानाकोपऱ्यात आता ‘वन की बात’ होणे गरजेचे आहे. ही गरज ओळखत आपण महाराष्ट्राचे वनमंत्री या नात्याने काम करीत आहोत. इतरांनीही यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here