Home राष्ट्रीय धक्कादायक :- ‘नीट’ परीक्षेच्या गुणपत्रिकेत मोठा घोळ, ‘एनटीए’वर शंका?

धक्कादायक :- ‘नीट’ परीक्षेच्या गुणपत्रिकेत मोठा घोळ, ‘एनटीए’वर शंका?

तब्बल 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण, 700 गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट दोन हजाराचा रॅक मिळण्याची शक्यता.

दिवस रात्र अभ्यास करून प्रचंड मेहनत करणाऱ्या नीट च्या विद्यार्थ्यांचे पालक आंदोलनाच्या पवित्र्यात?

मुंबई न्यूज नेटवर्क :-

देशात वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या ‘नीट’ सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होताच देशभर वाद निर्माण झाला आहे. २०२३ मध्ये केवळ दोन विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले असताना यंदा त्यात भर पडून तब्बल ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहे, दरम्यान ‘पात्रता गुणां’मध्ये (कट ऑफ) प्रचंड वाढ झाली. ७०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला थेट दोन हजारांच्या जवळपास ‘रँक’ मिळणार आहे. यावर्षी अचानक गुणांमध्ये तफावत दिसून येत असल्याने विद्यार्थी, पालकांकडून परीक्षा घेणाऱ्या ‘एनटीए’वर शंका उपस्थित केली जात आहे. काही पालकांनी निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णयही घेतला आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), अभिमत विद्यापीठे, केंद्रीय विद्यापीठांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस, बीडीए, आणि बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट’चा निकाल ४ जूनला जाहीर झाला. यात देशभरातून सुमारे २४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ५ लाख ४७ हजार ३६ विद्यार्थी आणि ७ लाख ६९ हजार २२२ विद्यार्थिनी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरल्या. यातील खुल्या गटातून ३ लाख ३३ हजार ९३२, ओबीसीतून ६ लाख १८ हजार ८९० एससीतून १ लाख ७८ हजार ७३८ एसटीतून ६८ हजार ४७९ आणि ईडब्ल्यूएसमधून १ लाख १६ हजार २२९ विद्यार्थी पात्र ठरले.

६०० ते ६५० गुण घेणाऱ्यांना यंदा प्रवेश मिळणार नाही?

देशातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या शासकीय आणि खासगी मिळून ५४९ महाविद्यालयांच्या ७८ हजार ३३ जागांसाठी प्रवेश दिला जातो. मात्र, उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या १३ लाख १६ हजार २६८ इतकी आहे. यात मागील वर्षीच्या तुलनेत १ लाख ७० हजारांनी वाढ झाली आहे. यात ७२० ते ६५० पर्यंत गुण मिळवणाऱ्यांच्या संख्येत चारपट वाढ झाली आहे. परिणामी, यंदा खुल्या गटाच्या ‘पात्रता गुणां’मध्ये ७२०-१३७ वरून ७२०-१६४ इतकी वाढ झाली आहे. त्यात मिळालेल्या गुणांच्या तुलनेत देण्यात आलेल्या रँकमध्ये मोठा फरक आहे. अनेक विद्यार्थ्यांची ७०० गुण मिळवल्यानंतरही रँक दोन दोन हजाराने खाली आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ६०० ते ६५० गुण घेणाऱ्यांना यंदा प्रवेश मिळणार की नाही, अशीही शंका उपस्थित केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here