Home महाराष्ट्र धक्कादायक :- राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांची हत्त्या करणारे आरोपी अजूनही...

धक्कादायक :- राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांची हत्त्या करणारे आरोपी अजूनही मोकाट?

 

हत्त्याकांडाची चौकशी करून गुन्हेगारांना शोधून काढा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मागणी.

प्रेस कट्टा :-

राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांची हत्त्या करणारे आरोपी अजूनही फरार असून त्यांच्या हत्येची चौकशी करून या हत्याकांडातील गुन्हेगारांना शोधून त्यांना कठोर शासन करण्याची मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.

वाढते अवैध व्यवसाय व त्यातून वाढत असलेली गुन्हेगारी आणि मोठ्या प्रमाणात फोफावलेला भ्रष्टाचार शिवाय यासाठी मिळत असलेला राजकीय राजाश्रय यामुळे पत्रकारांवर दिवसेंदिवस खुनी हल्ले होत आहे. अशाच प्रकारची दुःखद घटना राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या बाबतीत घडली असून दोन दिवसापूर्वी दुपारी समाजकंटकांनी त्यांचे अपहरण केले होते व त्याच रात्री त्यांचा मृतदेह सापडला होता. या घटनेमुळे महाराष्ट्रात सर्वत्र खळबळ उडाली होती परंतु आरोपी पोलिसांना अजूनपर्यंत सापडले नसून या घटनेबद्दल महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांमधे संतापाची लाट निर्माण झाली आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एका पत्रकारांची दिवसाढवळ्या अपहरण करून निर्दयपणे हत्या होते ही लांच्छनास्पद बाब आहे. दातीर यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून राहुरी परिसरातील भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला होता. पत्रकार दातीर यांची दिवसाढवळ्या अपहरण करून निर्दयीपणे हत्या करणा-या गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याची मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here