Home महाराष्ट्र कृषिवेध :- मंडणगड पं.स.चा हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रम,: 40,000 हळद रोपांची तयारी...

कृषिवेध :- मंडणगड पं.स.चा हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रम,: 40,000 हळद रोपांची तयारी पूर्ण

जिल्हापरिषद रत्नागिरी व पंचायत समिती,मंडणगडचा 5 एकर क्षेत्रावर नावीन्यपूर्ण  “पथदर्शक प्रकल्प”

मंडणगड (प्रतिनिधी):

जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती, मंडणगड कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने मंडणगड तालुक्यात प्रथमच हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणून हळकुंडापासून 40,000 हळदीचे रोपे प्रो-ट्रे मध्ये तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सुमारे 5 एकर क्षेत्रावर विविध शेतकऱ्यांच्या शेतावर हळद लागवड करण्यात येणार असून हा ‘पथदर्शक प्रकल्प’ असल्याची माहिती पं.स.च्या कृषी विभागाकडून देण्यात आली.

सन 2021 च्या खरीप हंगामात पंचायत समिती,मंडणगड कृषी विभागाने जिल्हा परिषदेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले. गेली 3-4 महिने या प्रकल्पाबाबतची माहिती शेतक-यांना देवून याबाबतचे प्राथमिक माहिती वजा प्रशिक्षणही पंचायत समितीमार्फत शेतक-याना देण्यात आले. ज्या इच्छुक शेतक-यांनी हळद लागवड करण्यास सहमती दर्शवली व पं.स.कडे नोंदणी केली,त्या शेतकऱ्यांच्या सहकार्याने सुमारे 5 एकर क्षेत्रावर हळदीची लागवड होणार आहे. कमीत कमी 1 गुंठा ते जास्तीत जास्त 10 गुंठे क्षेत्र लागवडीसाठी निवडण्यात आलेले आहे. या प्रकल्पाला संपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन पं.स.च्या कृषी विभागाचे कृषी अधिकारी,विस्तार अधिकारी(कृषी ) हे करणार आहेत.
मंडणगड तालुक्यात प्रथमच अशाप्रकरचा हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या पथदर्शक प्रकल्पात आबलोली ता.गुहागर येथील प्रगतीशील शेतकरी सचिन कारेकर यानी गेल्या 15 वर्षाच्या प्रयत्नाने निवड पद्धतीने विकसीत केलेल्या *स्पेशल कोकण -4( SK-4)* या रत्नागिरी जिल्ह्यात उत्तम प्रकारे होऊ शकणा-या हळदीच्या वाणाचा उपयोग करण्यात येणार आहे.

या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणून हळकुंडापासून 40,000 हळदीचे रोपे प्रो-ट्रे मध्ये तयार करण्याचे काम कुंबळे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात समीक्षा लोखंडे यांच्या रोपवाटिकेत पूर्ण झाले आहे. हळकुंडापासून रोपे तयार करण्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन पं.स.चे कृषी अधिकारी विशाल जाधव, विस्तार अधिकारी (कृषी) गजेंद्र पौनीकर व पवन गोसावी यांनी केले आहे.

सुमारे 5 एकर क्षेत्रावर विविध शेतकऱ्यांच्या शेतावर हळद लागवड करण्यात येणार असून हा ‘पथदर्शक प्रकल्प’ यशस्वी करण्यासाठी सभापती सौ.स्नेहल सकपाळ ,गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांनी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here