युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी नव्या उपचार पद्धतीचा लावला शोध?
वेब न्यूज नेटवर्क:-
आता देशातील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून हळू हळू कमी होऊ लागला आहे. अर्थात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असताना आता तिसऱ्या लाटेचा धोका सुद्धा वर्तविण्यात आल्याने तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरणाला वेग देण्याचं काम सुरू आहे. त्यात लवकरच भारतात नेजल स्प्रे म्हणून कोरोना वर एक पर्यायी साधन उपलब्ध होणार आहे. सोबतच यानंतर आता शास्त्रज्ञांनी आणखी एक उपचार पद्धत शोधून काढली आहे. कोरोना रुग्णाच्या शरीरात अँटी-कोविड नॅनोबॉडीज सोडून त्या माध्यमातून कोरोनाचा खात्मा करण्याची पद्धत शास्त्रज्ञांनी शोधली आहे. विशेष म्हणजे यामध्ये रुग्णाला केवळ अँटीबॉडी नाकावाटे शोषून घ्याव्या लागतील. म्हणजेच श्वासावाटे नॅनोबॉडीज शरीरात जातील. सर्दी झाल्यावर आपण इलहेलर वापरतो. तीच पद्धत यामध्ये वापरण्यात आली आहे. ही उपचार पद्धत कोरोनाविरोधात गुप्त हत्यार म्हणून काम करेल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे कोरोनाचे स्पाईक प्रोटिन नष्ट होतील. त्यामुळे कोरोना पसरण्याची प्रक्रिया निष्क्रिय होईल.
युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी नव्या उपचार पद्धतीचा शोध लावला आहे. संशोधकांनी अँटी-कोविड नॅनोबॉडीजचा प्रयोग हॅमस्टर नावाच्या प्राण्यावर करून पाहिला आहे. हॅमस्टर उंदरांच्या प्रजातीमधील एक जीव आहे. नव्या उपचार पद्धतीत नॅनोबॉडीज एखाद्या मोनोक्लोनल एँटीबॉडीजसारखं काम करतात.
खरं तर नॅनोबॉडीजचा वापर कर्करोगावरील उपचारातही केला जातो. त्यांचा आकार अतिशय सूक्ष्म असतो. त्यामुळे त्यांच्या उत्पादनासाठी येणारा खर्चदेखील कमी असतो. जागतिक स्तरावर नॅनोबॉडीजचा वापर केला जाऊ शकतो. भविष्यात येणाऱ्या अनेक आजारांशी लढण्यातही नॅनोबॉडीज महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. सायन्स ऍडव्हान्सेस जर्नलनं २६ मे २०२१ रोजी या संशोधनाबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.