Home Breaking News लक्षवेधक :- कोरोनाची लस टोचून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांनी एकदा ही बातमी वाचाच.

लक्षवेधक :- कोरोनाची लस टोचून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांनी एकदा ही बातमी वाचाच.

लस घेतल्यानंतर का दारू पिऊ नये? समज गैरसमज…

लक्षवेधक :-

कोरोनाची लस घ्यायची की नाही? याबद्दल बरेच समज गैरसमज सद्ध्या चर्चेत असून दारू पिता येणार नाही म्हणून आजही बरेच जण कोरोनाची लस टोचून घेण्यास टाळाटाळ करताना दिसतायेत. शिवाय, कुणाला हात निकामी होण्याची भीती, तर कुणाला आधीचे आजारपण वाढण्याची भीती आहे. या समज-गैरसमजांमागचं तथ्य नेमकं काय आहे, हे जाणून घेऊया.

“आजही कोरोनाविरोधी लस टोचून घेण्यासंदर्भात ग्रामीण भागात अनेक गैरसमज आहेत. लस घेतल्यानंतर जीव जाईल, कोव्हिडची लागण होईल अशी भीती लोकांमध्ये आहे. तसंच काही दिवस दारू पिता येणार नाही म्हणूनही अनेकजण लस घेत नाहीत,” असं लातूर जिल्हा रुग्णालयातील डॉ. गजानन हळखंचे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

ते पुढे सांगतात, “लसीकरण केंद्रात आलेल्या लोकांना लस टोचण्यापूर्वी आम्ही पुढचे काही दिवस दारू प्यायची नाही अशी सूचना करतो. पण असं सांगितल्यावर काही जण लस न घेताच परत जातात.”

महाराष्ट्रात ग्रामीण भागात लसीकरण सुरू आहे. मोठ्या संख्येने लोकांनी कोरोनाविरोधी लस टोचून घेतली आहे. पण लस घेतल्याने डोकं, हात, पाय दुखण्याच्या तक्रारी समोर आल्याने लोकांमध्ये गैरसमज पसरले आहेत.
16 जानेवारी 2021 पासून भारतामध्ये कोव्हिड -19 साठीच्या लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. ‘कोव्हिशील्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ लस वापरून भारतात लसीकरण सुरू आहे. अधिकाधिक लोकांनी लस घ्यावी असं आवाहन केंद्र आणि राज्य सरकारने केलं आहे.

गैरसमज काय आहेत आणि भीती का आहे?

महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली लसीकरणासाठी एक सुकाणू समिती नेमण्यात आलेली आहे. तसंच, राज्य कृती दल, राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हास्तरावर जिल्हा कृती दल, जिल्हा नियंत्रण कक्ष, तालुकास्तरावर तालुका कृती दल आणि तालुका नियंत्रण कक्ष अशी यंत्रणा आहे. यानुसार लसीकरण सुरू आहे.
पण आजही लोकांमध्ये कोरोनाची लस टोचून घेण्यासंदर्भात अनेक गैरसमज असल्याचं गावकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि कोव्हिड रुग्णालयातील डॉक्टर्स सांगतात.

लातूर येथील जिल्हा रुग्णालयाचे डॉ. गजानन हळखंचे यांनी बातमीदारांना माहीती देतांना सांगितलं, “आमच्या रुग्णालयात लसीकरण सुरू आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे पण तरीही मोठ्या संख्येने लोकांमध्ये आजही गैरसमज आहेत. लस घेतल्यानंतर जीव जाईल अशी भीती आहे. तसंच लस घेतल्याने कोव्हिड होईल असंही काहीजणांना वाटतं.”

ते पुढे सांगतात, “लस घेतल्यानंतर एक महिना दारू पिऊ नका असं आम्ही सांगतो. कारण लस टोचल्यानंतर दारू प्यायल्याने अॅलर्जी रिअक्शन किंवा लिव्हरवर परिणाम होण्याची शक्यता असते. तसंच दारूमुळे रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते.”

“पण असं सांगितल्यावर ज्यांना दारू प्यायची सवय आहे असे काहीजण लस न घेताच परत जातात,” असाही अनुभव आल्याचं त्यांनी सांगितलं.

तर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप देसले सांगतात, “आमच्या भागातही लोकांमध्ये असे गैरसमज आहेत. हात, पाय दुखतील म्हणून लोक लस घेण्यासाठी जात नाहीत. एकजण कुणीतरी सागतं की लस घेतल्यानंतर पाय दुखायला लागला, मग इतरांमध्येही भीती निर्माण होते. तसंच दारू पिण्यावर काही दिवस बंधन येईल म्हणून टाळाटाळ करतात.”
अनेक गावांमध्ये लस टोचण्यापूर्वी आरोग्य तपासणी केली जात आहे. कोरोनाची लक्षणं असताना लस घेऊ नये, अशा आरोग्य विभागाच्या सूचना आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणी लोकांची अँटिजन चाचणीही करून घेतली जात आहे.

कोव्हिडची लागण झाली असल्यास चार ते आठ आठवड्यांनी लस घेण्याची सूचना आरोग्य विभागाने केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रांझणी गावाचे ग्रामसेवक लियाकत शेख सांगतात, “लस देण्यापूर्वी गावातील आरोग्य केंद्रात कोरोनाची चाचणी करून घेतली जाते. कारण कोव्हिडची लागण झालेल्या व्यक्तीला लस देता येत नाही. त्यामुळे अशी चाचणी केल्यानंतर काही लोक पॉझिटिव्ह येतात आणि मग लोकांमध्ये भीती पसरते. आपणही लस घेण्यासाठी गेलो आणि कोरोना चाचणीमध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल या भीतीने लोक लसीकरणासाठी येत नाहीत.”

ते पुढे सांगतात, “पण ही परिस्थिती हळूहळू सुधारत आहे असंही ते म्हणाले. कोव्हिडची लागण झाल्यास आम्ही गावकऱ्यांना समजावतो की हा बरा होणारा आजार आहे. लसीकरणाबाबतही जनजागृती सुरू केली आहे.”

आदिवासी पाड्यांमध्येही कोरोना आजार आणि लस दोन्हीबाबत नागरिकांमध्ये भीती आहे. याठिकाणी लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे असंही वैद्यकीय अधिकारी सांगतात.
भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव कवळे सांगतात, “आदिवासी गाव आणि पाड्यांमध्ये जोपर्यंत त्यांचे स्थानिक नेते किंवा विश्वासू गावकरी सांगत नाही तोपर्यंत ते विश्वास ठेवत नाहीत.”

“लस घेतल्यानंतर हात लुळा पडतो, ताप येतो, लस टोचल्याने कोरोना होण्याची लक्षणं दिसतात यामुळेही लोक घाबरतात. पण आम्ही लोकांशी बोलून त्यांच्या शंकांचं निरसन करत आहोत.” असंही ते म्हणाले.

कोरोनाची लस सुरक्षित आहे का?

कोरोनावरील लस सुरक्षित असावी, हे लक्षात घेऊन भारत सरकारने ड्रग कंट्रोलर संस्थेला आदेश दिलेत की, लशीला तेव्हाच परवानगी द्यावी, जेव्हा तिने परिणाम आणि सुरक्षेचे मापदंड पार केलेले असतील.

भारतातील लस सुरक्षित असेल, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय. आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांनुसार, लस टोचून घेतल्यानंतर आरोग्य केंद्रावरच अर्धा तास आराम करावा.
लस टोचल्यानंतर तुम्हाला कुठलाही त्रास झाल्यास तातडीने जवळच्या आरोग्य अधिकारी, डॉक्टर, एएनएम किंवा आशा कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा,” असं आवाहन आरोग्य मंत्रालयाने केलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 2 ते 3 आठवड्यांनी रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, लस इतर आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी सुरक्षित आहे. अशा रुग्णांना कोरोनाविरोधी लस घेण्याचे खूप फायदे आहेत. पण लशीबद्दल प्रश्न असतील तर डॉक्टरांना विचारून शंका निरसन करून घ्यावं असंही डॉक्टर्स सांगतात.

मधुमेह, किडनी आणि हृदयरोगाने ग्रस्त रुग्णांना औषध घ्यावी लागतात. सरकारच्या माहितीनुसार, कोव्हिड-19 लस घेण्याआधी कोणती औषधं घेऊ नयेत याबाबत विशेष सूचना नाही. सामान्यतः सुरू असलेली औषधं घेता येऊ शकतात.

लस देणाऱ्यांना तुम्ही कोणती औषधं घेत आहात याबाबत माहिती द्या, असं आवाहन तज्ज्ञांनी केलंय.

तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक लशीचे साइट इफेक्ट असतात. त्यामुळे घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही.

लस दिल्यानंतर अर्धातास लसीकरण केंद्रावरच लस दिलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवलं जातं.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, लस सुरक्षित आहे. लस घेतल्यानंतर काही त्रास जाणवला तर डॉक्टरांना कळवावे असंही आवाहन करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here