हिंदुस्तान अवाम मोर्चाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांची मागणी.
न्यूज नेटवर्क ;-
भारतात कोरोना संकट काळात सुद्धा मोदींची जाहिरातबाजी कमी होण्याचे नाव घेत नसून कोरोनाची लस घेतल्यानंतर देणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आलेला आहे. यासंदर्भात विरोधकांसोबतच भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. झारखंड आणि छत्तीसगडनं तर प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
यानंतर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या हिंदुस्तान अवाम मोर्चाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी एक वेगळीच मागणी केली आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या मृत्यू प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो छापण्यात यावा, अशी मागणी मांझी यांनी केली आहे.
बिहारमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) सत्ता आहे. जीतनराम मांझी यांचा हिंदुस्तान अवाम मोर्चा या आघाडीतील घटकपक्ष आहे. त्यामुळेच मांझी यांनी केलेल्या मागणीनं सगळ्यांनाच धक्का बसला. ‘कोरोनाची लस घेतल्यानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर मोदींचं छायाचित्र छापण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या व्यक्तींच्या मृत्यू प्रमाणपत्रांवर देखील मोदींचा फोटो असायला हवा,’ असं ट्विट मांझी यांनी केलं आहे.