अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्यांचा प्रश्न निकाली?
वरोरा प्रतिनिधी :-
वरोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या रस्त्यांच्या मागणीसाठीच्या तक्रारी तहसील कार्यालयात कित्तेक वर्षापासून पडून होत्या पण त्यावर पाहिजे त्या प्रमाणात तोडगा निघाला नव्हता त्यामुळे काही शेतकऱ्यांनी तर अक्षरशः आपल्या हक्काच्या शेतीत उत्पन्न सुद्धा घेणे सोडले होते, रस्ता हा शेतकऱ्यांसाठी अति आवश्यक असताना काही विकृत मानसिकता असलेले व्यक्ती अवैधरित्या जमिनीवर कब्जा करून तर काही सामाजिक भान न ठेवता अन्य शेतकऱ्यांच्या वहिवाटीच्या रस्त्यात हेतुपुरस्सर अडथडे निर्माण करून, वाद घालत गावातील शांतता, सुव्यवस्थेला बाधा आणत होते, शेतकऱ्यांच्या या ज्वलंत समस्या लक्षात घेता तहसीलदार बेडसे यांनी आपल्या महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने दिनांक १ ते १५ जून दरम्यान ‘ शेत रस्ता पंधरवडा’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून तब्बल ८२ विवादित प्रकरणं निकालात काढीत २४ ठिकाणचे रस्ते मंजूर केले.
वरोरा तालुक्यात पहिल्यांदाच राबविण्यात आलेला हा उपक्रम जिल्ह्यातील इतर तालुक्यासाठी प्रेरणादायी असून खुल्या झालेल्या रस्त्यांमध्ये पुन्हा कोणीही अडथडे निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्या समाजकंटकाविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून अद्दल घडविण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी त्यांच्या दालनात आयोजित बैठकीत दिला.
तहसील बेडसे पुढे म्हणाले की, शेतरस्ता अडविल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी जाताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. शेतात जाण्यासाठी जर रस्ता नसेल तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची गैरसोय होते आणि शेतीशी संबंधित कामे तो योग्य प्रकारे पार पाडू शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन तसेच रस्त्याच्या कारणावरून शेतकऱ्यांमध्ये वादविवाद होऊन शांतता व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून शेतीचा खरीप हंगाम सुरू होण्याआधी आणि कोव्हीड १९चे निर्बंध कमी झाल्यानंतर तात्काळ तालुका प्रशासनाने १ जून ते १५ जून २०२१ या कालावधीत शेत रस्ता पंधरवाडा ही योजना हाती घेतली. सर्व मंडळ अधिकारी नायब तहसीलदार यांच्या मदतीने २४ रस्ते खुले करून दिले आहेत.यामुळे शेतकऱ्यांच्या विकासाचा, प्रगतीचा मार्ग मोकळा होण्यास निश्चितच हातभार लागेल, असा विश्वास तहसीलदार बेडसे यांनी व्यक्त केला.