Home वरोरा मोवाडा गावांत भीषण पाणी टंचाई, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठांना निवेदन

मोवाडा गावांत भीषण पाणी टंचाई, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठांना निवेदन

पाणी पुरवठा योजनेचे तिनतेरा वाजविणाऱ्या सरपंच व इतरांवर कारवाई करण्याची मागणी.

वरोरा प्रतिनिधी :-

तालुक्यातील अनेक गावांत पाणीपुरवठा योजनेचा बट्ट्याबोळ झाला असून काही गावातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी सुद्धा मिळत नसल्याने ग्रामपंचायत सरपंच सचिव व इतर सदस्यावर गावकऱ्यांचा मोठा रोष आहे. खरं तर गावांचा कारभार सरपंच उपसरपंच यांच्याकडे असतो व त्यांच्या माध्यमातून गावांचा विकास साधल्या जातो परंतु गावागावांत सरपंच उपसरपंच यांना गावाच्या विकासापेक्षा स्वतःचा विकास महत्वाचा वाटतो व म्हणूनच गावागावांत समस्यांचा डोंगर उभा राहून गावकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याचे गंभीर प्रकरणे उजेडात येत आहे. असेच एक गंभीर प्रकरण पिजदुरा मोवाडा या गट ग्रामपंचायत अंतर्गत घडत असून मोवाडा या गावाच्या काही भागात सरपंच व इतर सदस्याद्वारे जाणीवपूर्वक पिण्याचे पाणी दिल्या जातं नसल्याचा व पाणी पुरवठा योजनेचे इलेक्ट्रिक बिल भरले नसल्याने नळ योजना बंद केल्याचा आरोप गावातील महिलांनी केला आहे. दरम्यान गावातील महिलांनी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती वरोरा यांना निवेदन देऊन त्वरीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा आम्ही आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

मोवाडा गावांतील काही भागात हँड पंप व बोरिंग नसल्याने पाणी पुरवठा योजनेचे नळ यावर त्यांची भिस्त आहे पण ग्रामपंचायत पिजदुरा चे सरपंच यांनी इलेक्ट्रिक बिल भरले नसल्याने तब्बल बारा दिवसांपासून नळ बंद आहे त्यामुळे गावकऱ्यांनी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारी ची दखल घेऊन गावातील महिलांना घेऊन पंचायत समिती कार्यालयात संवर्ग विकास अधिकारी यांना मनसे तर्फे निवेदन देऊन या पाणी प्रश्नावर तात्काळ तोडगा काढावा अन्यथा मनसे आंदोलन करेल असा इशारा दिल्यानंतर संवर्ग विकास अधिकारी यांनी तात्काळ ग्रामपंचायत सचिव यांना फोन करून मोवाडा गावातील पाणी पुरवठा योजनेचे इलेक्ट्रिक बिल भरून नळ सुरू करण्याचे आदेश दिले परंतु या संदर्भात सरपंच व इतर सदस्य राजकारण करत असल्याने गावातील महिलांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेण्याचे ठरवले आहे. या प्रश्नावर संवर्ग विकास अधिकारी यांच्या आदेशानंतर सुद्धा जर पाणी प्रश्न सुटत नसेल तर मग येथील ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व सचिवांवर कारवाई करा अशी मागणी होतं आहे.

Previous articleराजकीय :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार या महिन्यात ?
Next articleसालोरी गावाच्या घरकुल प्रश्नांबाबत संवर्ग विकास अधिकाऱ्यांना घेराव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here