Home वरोरा खरंच, संजय देवतळे साहेब तुम्ही आमदार म्हणून हवे होते,

खरंच, संजय देवतळे साहेब तुम्ही आमदार म्हणून हवे होते,

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात राजकीय वैर धोक्याच्या वळणावर जातंय,

व्यक्तिविशेष :-

माणूस जोपर्यंत राजकारणात असतो तेव्हा त्यांच्याबद्दल नानाप्रकारचे अपशब्द, त्याची टवाळकीं, त्यांची निंदा नालस्ती आणि त्याच्यावर नको ते आरोप होत असतें, पण जेंव्हा ते आपल्यात नसते तेंव्हा मात्र त्यांच्या गुनविशेषाचा गौरव होत असतो, परंतु याला सुद्धा राजकारणात काही अपवाद असतात आणि तो अपवाद म्हणजे स्वर्गीय माजी पालकमंत्री संजय देवतळे, ते आमदार मंत्री असतांना कधी त्यांच्यावर सूडबुद्धीने राजकारण केल्याचा व राजकीय वैर पाळल्याचा आरोप झाला नाही, एवढंच नव्हे तर शांत आणि संयमी स्वभावाच्या या माणसाने कधी राजकीय हेतूने कुणाचा गेम करण्याचा प्रयत्नही केला नाही, खरं तर असा माणूस राजकारणात टिकला तो त्यांच्या जनसंपर्काच्या भरोशावर कारण त्यांनी माणसं कमावली होती जी त्यांच्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढायची. संजय देवतळे हे तब्बल 20 वर्ष आमदार म्हणून अर्थात दोन दशके राजकारणात टिकले आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात ते प्रभावीही ठरले. आता मात्र या विधानासभा क्षेत्रात ज्या पद्धतीचे सुडाचे राजकारण व राजकीय वैर पाळून गुंडाशाही राज सुरु आहे, त्यावरून संजय देवतळे साहेब तुम्ही पुन्हा आमदार म्हणून आम्हांला हवे होते अशी येथील जणांसामान्यांची भावना व्यक्त होतं आहे.

राजकारणात लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांचं प्रतिनिधित्व करणारा एक सच्चा सेवक, लोकांचे जिवंत आणि ज्वलंत प्रश्न सोडविण्याची त्यांच्यावर जबाबदारी, पण लोकप्रतिनिधी यांची आता व्याख्याच बदलली असल्याचे चित्र दिसत आहे, दरम्यान ते चित्र बघितले तर स्वर्गीय संजय देवतळे यांचा तो वीस वर्षाचा काळ आठवतो, जिथे सर्वपक्षीय लोकांना आपले मत मांडण्याचा अधिकार होता, पत्रकारांना आपल्या धारदार लेखणीतुन शासन प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यावर प्रहार करण्याची मुभा होती, प्रतिस्पर्धी उमेदवारांवर आरोप लावण्याची व त्यांना चिमटे काढण्याची पण मुभा होती, सकाळी विरोधात बोलल्यानंतर सायंकाळी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात एकमेकांना नमस्कार,जय महाराष्ट्र, जय भीम, जय पेरसापेन म्हणून बोलचाल व्हायची परंतु बदललेली राजकीय परीस्थिती व वैचारिक देवाघेवाण याचा अभाव यामुळे येथील राजकीय वातावरण गढूळ झाले आहे, इथे कार्यकर्ते पत्रकारांवर गुंडांकडून जीवघेणे हल्ले व्हायला लागले आहे आणि सगळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले असल्याने स्वर्गीय संजय देवतळे यांचे सर्वसमाज समावेशक राजकारण  आठवल्याशिवाय राहत नाही

संजय देवतळे यांचे दोन वर्षांपूर्वी करोना आणि त्यातच हृदयविकाराचा झटका यामुळे निधन झाले होते. त्यांचे असे आकस्मिक जाणे वेदणादायी व तेवढेच धक्कादायक ठरले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात ते पर्यावरण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादासाहेब देवतळे यांचा राजकीय वारसदार म्हणून ते उदयास आले. दादासाहेबांच्या अकाली निधनानंतर झालेल्या रिक्त जागेवरून वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा निवडून आले. नंतर सलग वीस वर्षे त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. काँग्रेसने त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी नाकारली. ते भाजपकडून लढले. याही वेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मागील विधानसभा निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढविली; मात्र यश आले नाही.

देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक असलेल्या चंद्रपूरसाठी पर्यावरणमंत्री म्हणून त्यांनी घेतलेला सक्रिय पुढाकार महत्त्वाचा होता. प्रदूषणाने कमालीची श्वासकोंडी होऊ लागल्याने वाढत्या असंतोषाची दखल त्यांनी घेतली. प्रदूषण कमी करण्यासाठीचा कृती आराखडा अमलात आणण्यासाठी त्यांनी यंत्रणा हलविली. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून लागले. चंद्रपूर जिल्हा दारूबंदीसाठी जनमानसाचा रेटा वाढला असता, सरकारने दारूबंदी समिती नेमली. या समितीच्या अध्यक्षपदी देवतळे होते. या समितीच्या अहवालाच्या आधारे फडणवीस सरकारने दारूबंदीचा निर्णय घेतला. चंद्रपूरच्या पंचशताब्दी सोहळ्यात त्यांचे सक्रिय योगदान होते. अलीकडेच ते पुन्हा भाजपवासी झाले होते. बदलत्या राजकारणात त्यांना पुन्हा सूर गवसला नसला, तरी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना त्यांचा साधेपणा भावायचा आणि विरोधी पक्षातील नेत्यांसाठी ते अजातशत्रू होते अशा या शांत संयमी व लोकप्रिय स्वर्गीय संजय देवतळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

Previous articleसन २०२३ मध्ये जि. प. कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या सर्वसाधारण बदल्यांबाबत वेळापत्रक केले जाहीर
Next articleश्री. वासवी कन्यका मातेचा 86 वा प्राणप्रतिस्थापना दिन आणि जयंती महोत्सवा निमीत्त निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here