Home Breaking News प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांच्या भाजपा प्रवेशाला विघ्न?

प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांच्या भाजपा प्रवेशाला विघ्न?

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, ओबीसी नेते तसेच यांचा चंद्रपुरात जिल्ह्याच्या शैक्षणिक वतुरात  दबदबा असलेले शिक्षण सम्राट प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे हे मागील काही महिन्यांपासून भाजपा नेत्यांच्या संपर्कात असून, त्यांचा भाजपा प्रवेश निश्चित समजला जात असतानाच काही नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचा पक्षप्रवेश टळला असल्याचे सांगण्यात येते.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चंद्रपुरात मातोश्री वृद्धाश्रमाच्या कार्यक्रमासाठी आले तेव्हापासून डॉ. अशोक जीवतोडे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर नागपूर विभागाच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आमदार बंटी भांगडिया यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांसोबत बैठकाही झाल्या. फडणीस यांचा चंद्रपूरात मोठा कार्यक्रम

आयोजित करून त्या कार्यक्रमातच कार्यकर्त्यांसह प्रवेश करण्याचे डॉ. अशोक जीवतोडे यांनी निश्चित केले होते. मात्र, त्यांच्या भाजपा प्रवेशाला जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याने विरोध केल्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश रखडल्याचे सांगण्यात येते. भाजपात लोकसभा निवडणुकीसाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची नावे चर्चेत आहेत. डॉ. अशोक जीवतोडे यांच्यासारखा ओबीसी चेहरा भाजपामध्ये आल्यास तेसुद्धा लोकसभेचे

दावेदार ठरू शकत असल्याने त्यांच्या प्रवेशाला पक्षाच्या अंतर्गत वर्तुळातूनच विरोध केला जात असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस, आमदार बंटी भांगडिया आणि माजी आमदार अॅड. संजय धोटे हे जीवतोडे यांच्या पक्षप्रवेशासाठी इच्छुक आहेत. मात्र, पक्षातूनच काही नेत्यांचा विरोध होत असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चंद्रपुरात कार्यक्रम घेऊन पक्षप्रवेश करण्यापेक्षा आता मुंबईतच पक्षप्रवेश करण्याची योजना आखली जात असल्याचे

जीवतोडे यांच्या निकटवर्तीय वर्तुळातून सांगण्यात येते. जीवतोडे हे पूर्वाश्रमीचे भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणूनच ओळखले जातात. राष्ट्रीय ओबीसी महासंघाशी जुळल्यानंतर त्यांची वैचारिक बैठक तुटली. आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सुरुवातीला भाजपाशी जवळीक साधूनही काहीही मिळाले नाही. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फार काही मिळेल, असे चित्र दिसत नाही.. आपल्या मागचे पुढे जात आहेत. आपण मागेच पडत आहोत, अशी त्यांची भावना झाली असून, आता पुन्हा भाजपामध्ये जाण्याची गाठ डॉ. अशोक जीवतोडे यांनी बांधली आहे. मात्र, त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त केव्हा निघेल, हे अद्याप अनिश्चित असले तरी मुहूर्त निघणार, हे निश्चित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here