Home वरोरा एल्गार :- एकोणा खाणीमुळे बेरोजगार तरुणांनी वेकोली प्रशासनाविरोधात पुकारला एल्गार.

एल्गार :- एकोणा खाणीमुळे बेरोजगार तरुणांनी वेकोली प्रशासनाविरोधात पुकारला एल्गार.

लोकप्रतिनिधीनी पाठ फिरवल्याने गावकरी हतबल. मागण्या मान्य न झाल्यास इच्छामरणाची परवानगी देण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील एकोणा कोळसा खाणीत जमिनी गेल्यामुळे बेरोजगार झालेल्या शेतमजुरांना आश्वासन देऊनही अजून पावेतो कंपनीने अस्थाई रोजगार उपलब्ध करून न दिल्याने या नागरिकात प्रचंड असंतोष आहे. आपणास रोजगार मिळावा तसेच माढेळी-वरोरा रस्त्यांवर येण्यासाठी नवीन रस्ता न करता विद्यमान रस्ताच उपलब्ध करून द्यावा अशी मागणी एकोणावासीयांनी केली असून आपल्या मागण्यांना मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा एकोणावासीयांनी दिला आहे .काही बेरोजगार युवकांनी तर आपणास इच्छा मरण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे.

एकोणा कोळसा खाणी साठी जमिनी संपादित करीत असतांना प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला व परिवारातील सदस्यांना नोकरी देण्यात आली. परंतु शेतीवर मजुरी करणाऱ्या शेतमजूर बेरोजगार झाले. या बेरोजगारांना कंपनीत अस्थायी नोकरी देण्याचे मान्य केले असतानाही कंपनीने अजूनपावेतो रोजगार उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी या बेरोजगार शेतमजुरांनी अनेक आंदोलन केली. नेत्यांना निवेदनही दिली. परंतु कोणताही परिणाम न झाल्याने आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

वरोरा तालुक्यात एकोणा कोळसा खाणीसाठी चरूरखटी, वनोजा, नायदेव, मार्डा व एकोणा या गावाच्या जमीनी 2016 मध्ये वेकोलीने संपादित केली. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. त्यांना त्या जमिनीचा मोबदला व भूधारकांना रोजगारही उपलब्ध झाला.
परंतु या शेतजमिनी वेकोलीने संपादित केल्याने शेतमजुरांना काम न राहिल्याने त्यांच्यावर उपासमारीचा प्रसंग उद्भवला आहे.भूमिहीन शेतमजूर व गावातील बेरोजगारांना वेकोलीमधील कंत्राट असलेल्या कंपनीमध्ये अस्थायी स्वरूपाचा रोजगार मिळावा यासाठी गावातील बेरोजगार 2017 पासून मागणी करीत आहे. परंतु या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने आपल्या मागणीसाठी मार्च 22 मध्ये त्यांनी दहा दिवसाचे उपोषणही केले होते.

तत्कालीन पालकमंत्री विजय वडेट्टीवार व चंद्रपूरचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी त्यावेळी दिलेल्या आश्वासनामुळे गावकऱ्यांनी आपले उपोषण थांबवले व रोजगार मिळण्याची प्रतीक्षा करू लागले. परंतु आजतागायत या बेरोजगारांना कोणताही रोजगार उपलब्ध झालेला नाही.2020 व 2022 या कालावधीत एकोणा गावाच्या परिसरातील उर्वरित जमिनी सुद्धा वेकोलीने संपादित केल्याने शेतमजुरांना शेतमजुरीचे कोणतेही काम राहिले नाही.
एकोणा खाणीत महालक्ष्मी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कार्यरत आहे. परंतु सदर कंपनीने स्थानिक रोजगारांना रोजगार देण्याऐवजी परप्रांतीयांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे.

तसेच एकोणा चरूरखटी हा गावचा मुख्य रस्ता असून गाव एकोणा गावाचे पुनर्वसन होईपर्यंत सदर रस्ता कायम ठेवावा. कारण सदर रस्ता दळणवळणासाठी सुलभ आहे.गावाच्या पश्चिमेस वर्धा नदी व उत्तरेस दैवल नाला आणि गावाच्या सभोवताल विकोलीचे डम्पिंग यार्ड केले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुराचा धोका संभवतो. गावाचा मुख्य रस्ता बदलल्यास संपूर्ण गाव अडचणीत येईल शिवाय हा प्रस्तावित रस्ता ज्या भागातून जाणार आहे.ती जागा सुनसान असल्याने मुले-मुली व महिला यांना गैरसोयीचा ठरू शकतो व मधे दैवलनाला असल्याने पावसाळ्यात अडचणीचे होऊ शकते.त्यामुळे गावाचे पुनर्वसन होईपर्यंत विद्यमान रस्ता कायम ठेवण्यात यावा ही गावकऱ्यांची मागणी आहे .

गावकऱ्यांनी या समस्या वेकोली प्रशासनासमोर अनेकदा मांडल्या.परंतु वेकोली जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामवासियांनी केला असून गावकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता समस्यांबाबत ग्रामवासियांना न्याय द्यावा अशी मागणी गाववासियांनी केली आहे.आपल्या मागण्या मान्य होत नसल्यास आपणास इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी विनंती बेरोजगार शेतमजूरांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here