Home Breaking News नागपूर-चंद्रपूर भद्रावती-घुग्घूस-राजुरा शहर ‘समृद्धी’ महामार्गाला जोडणार !

नागपूर-चंद्रपूर भद्रावती-घुग्घूस-राजुरा शहर ‘समृद्धी’ महामार्गाला जोडणार !

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

आराखड्याला अंतिम मान्यता : रस्ते व दळणवळण क्षेत्रात मोठे बदल होणार

चंद्रपूर  :-  मुंबई ते नागपूर ही शहरे जोडणारा ६०० कि. मी. लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सुरू झाला आहे. समृद्धी महामार्गाला आता महाराष्ट्रातील पूर्व व पश्चिम सीमा जोडण्यात येईल. त्यासाठी नागपूरपासून चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती-घुग्घूस-राजुरा “मार्ग गडचिरोली जिल्ह्यातील नवेगाव (गोर) पर्यंत नेण्याचा आराखडा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तयार केला होता. राज्य शासनाने या आराखड्याला २८ डिसेंबर रोजी अंतिम मंजुरी दिली. त्यामुळे बहुचर्चित समृद्धी महामार्गामुळे जिल्ह्यातील दळणवळण क्षेत्रात आगामी काळात मोठे बदल

घडणार आहेत. पूर्व विभागातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या नैसर्गिक खनिज साधनाने समृद्ध असलेल्या अल्प विकसित भागांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नागपूर ते गोंदिया (पॅकेज १), भंडारा ते गडचिरोली (पॅकेज २) व नागपूर ते चंद्रपूर (पॅकेज ३) अंतर्गत प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यात आले आहे. त्यातील नागपूरपासून चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती-घुग्घूस-राजुरा मार्गे गडचिरोली जिल्ह्यातील नवेगाव (गोर) पर्यंत नेण्याचा आराखडा तयार करण्यात आला.

महामंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष स्थळ पाहणी झाली. शिवाय, विविध पर्यायी आखणींचाही अभ्यास करण्यात आला. तुलनात्मकदृष्ट्या सर्वाधिक सुयोग्य आराखडा म्हणून महामंडळाने राज्य सरकारकडे प्रस्तावित केला. या आराखड्याला सरकारने अंतिम मान्यता प्रदान केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव राहुल गिरीबुवा यांनी २८ डिसेंबरला याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.

                 असा असेल महामार्ग…

समृद्धी महामार्गावरील वर्धा जिल्ह्याच्या सेलडोह इंटरचेंजवरून भद्रावती-घुग्घूस ते राजुरापर्यंत हा मार्ग जोडला जाईल. हा महामार्ग हैदराबाद महामार्गावरील गडचिरोली जिल्ह्याच्या नवेगाव मोरपर्यंत पोहोचेल. या मार्गाची एकूण लांबी १८२.४२८ कि. मी. आहे. समृद्धीलाच जोडणारा घुग्घुस इंटरचेंज ते चंद्रपूर जोडरस्ता ११.९६९ कि. मी. असा एकूण १९४.३९७ की.मी. अंतराचा असल्याचे शासनाने नमूद केले आहे.

समद्धीला जोडण्याचे कारण काय?

■ नागपूर-चंद्रपूर प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार दुतगती महामार्ग विकसित करणे ही पूर्व महाराष्ट्रातील प्रमुख विकास योजनांपैकी एक आहे. त्यानुसार, चंद्रपूर-गडचिरोलीमुळे राज्याच्या पूर्व व पश्चिम सीमांना दुतगती महामागनि जोडता येईल. देशाच्या उत्तर व ईशान्येकडील गध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा व पश्चिम बंगाल राज्यांशी द्रुतगती महा- मार्गाद्वारे आंतरराज्यीय संपर्क स्थापित होईल.

■ आंतरराज्य प्रवासी व मालवाहतुकीमुळे समृद्धी महामार्गाची व्यवहार्यता सुधारण्यास मदत होईल. पूर्व महाराष्ट्रातील अल्प विकसित जिल्ह्यांचा सामाजिक आर्थिक विकास होईल, पायाभूत सुविधांचा लाभ व आदिवासी भागाच्या विकासाला हातभार लागेल, उद्योगांना चालना मिळून रोजगार निर्मिती होईल, असे दावे राज्य सरकारने केले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here