राज्यात आणि देशात एवढे जिवंत आणि ज्वलंत प्रश्न उभे ठाकले असतांना संभावित उमेदवारांची ही कसली नाटकं? एक चिंतन
राजकीय कट्टा :-
येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षाच्या संभावित उमेदवारांना वेध लागले असल्याने सर्वच पक्ष वाजतगाजत कामाला लागल्याचे दिसून येत आहे. यातच सगळीकडे बैठकांना उधाण आले असून काही इच्छुक उमेदवार तिकीट पक्के झाल्याचा दावा करीत आहेत, दरम्यान जणू आपल्याला उमेदवारी पक्की झाल्याच्या नादात विविध स्पर्धेचे आयोजन व सणासुदीच्या निमित्याने गावागावात शहरातील वार्डावार्डात शुभेच्छा बैनर लावून मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्याचा सपाटा विधानसभेच्या संभावित उमेदवारानी सुरु केला आहे, जो तो आपणच भावी आमदार म्हणून जनतेला शुभेच्छा देण्यासाठी बैनरबाजी करून जणू लोकशाहीच्या या रनसंग्रामात स्वतःला आमदार समजत आहे, काही संभावित उमेदवार तर ज्या पक्षाला सोडचिठठी देऊन दुसऱ्या पक्षाची सत्तेसाठी माती खाल्ली ते सोडून स्वगृही परतत आहे व उमेदवारीसाठी फिल्डिंग लावत आहे. काही नवखे तर पैसे आहेत म्हणून जातीचा हिशोब करून निवडणुकीत जिंकण्याचे स्वप्नं बघत आहे आणि त्यासाठी प्रसिद्धी मिळावी म्हणून क्रीडा स्पर्धा, बैल पोळ्याच्या सजावट स्पर्धा तर काही उमेदवारांचे भाडोत्री कार्यकर्ते गावागावात उमेदवाराचा प्रचार करताहेत, काहीनी आपल्या समाजाचे मेळावे सुरु केले आहेत,पण चिंतेची बाब ही आहे की जनतेच्या ज्वलंत आणि जिवंत प्रश्नांना कुणी हात घालत नाही, जनतेच्या नेमक्या काय समस्या आहेत? त्या समजून त्या समस्या आपण सोडविल्या पाहिजेत याचा विचार मात्र कुणी करायला तयार नाही, फक्त यांना आमदार बनायचे आहे मग त्यासाठी हे कुठल्याही स्तराला जायला तयार आहे, काय स्पर्धा घेण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी यांना आमदार खासदार म्हणून निवडून द्यायचे का हा चिंतेचा आणि चिंतनाचा गंभीर विषय आहे.
खरं तर भारतीय लोकशाहीत सर्वाना समान अधिकार आहेत, कुणीही निवडणुकीत उभे राहू शकतात त्यासाठी शिक्षणाची अट नाही, सरकारला अधिकारी कर्मचारी नेमताना त्यांची शैक्षणिक अहर्ता लागू आहे, पण जे सरकार जनतेच्या विकासाचा आराखडा व पुढील पिढीचं भविष्य निर्माण करतो त्या सरकार मध्ये मात्र मंत्र्यांना किंवा आमदार खासदार यांना शिक्षणाची अट नाही ही भारतीय लोकशाहीची विटंबनाचं म्हणावी लागेल, यात महत्वाची बाब म्हणजे आपल्याकडे विकासाच राजकारणं होतं नाही तर आपल्याकडे जातीच्या व पैशाच्या समीकरणात चांगला लढवय्या नेता हरत असतो आणि जनतेला पण याचं काहीएक सोयरसुतक नसतं कारण निवडणुकीच्या मतदानावेळी आपली जनता एक उत्सव म्हणून पैसे घेतात दारू चिवडा आणि पार्ट्या करतात आणि मग पाच वर्ष त्याच व्यक्तीच्या नावाने बोटे मोडत बसतात, आश्चर्यांची बाब म्हणजे जे लोकप्रतिनिधी निवडून येतात त्यांच्याकडे जाण्यासाठी जनता घाबरते जणू ती गुलाम आहे कारण ते सरळ म्हणतात मला तुम्ही फुकट निवडून दिले नाही त्यासाठी मी पैसे मोजले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा क्षेत्रात संभावित उमेदवरांचा पूर आलाय, ज्यांनी कधी कुठे समाजसेवा केली नाही ते समाजसेवेचे बुरखे पांघरून गावागावात जनतेचे लक्ष स्वतःकडे वळविण्यासाठी बैनरबाजी करताहेत, यात कुणी छत्र्या वाटतात, रेनकोट वाटतात, कुणी वह्या बुक वाटतात तर कुणी ग्रामगीता वाटतात, काहींनी तर काही गोरगरीबांच्या अडचणीचे आणि दुःखाचे पण बाजारीकरण करून त्यांना मदतीचे फोटो काढून आपली प्रसिद्धी चालवलेली आहे, यामध्ये जातीय समीकरण जुळविण्यात काहींनी आपल्या जाती संभावित उमेदवारांच्या दावणीला बांधल्या आहे, एकूणच जनतेच्या विकासाचा व त्यांच्या प्रगतीचा एजंडा सोडून संभावित उमेदवारांचे भलतेच नाटकं सुरु आहेत पण महत्वाची बाब म्हणजे याही परिस्थितीत जनतेची सेवा करणारे जनसेवक जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करताहेत, पण ते प्रसिद्धीसाठी बैनरबाजी करत नाही हे जनतेनी समजून घयायला पाहिजे, आपल्या समाजाचं, आपल्या गावाचं शहराचं भलं कोण करू शकतो, ती ताकत कुणाकडे आहे याचा अभ्यास करूनच जनतेने आपला भावी आमदार ठरवावा हीच सुजान नागरिकांना अपेक्षित आहे.