मतांच्या लाचारीसाठी डॉ. अभिलाषा गावतुरे पातळी सोडून प्रचार करत असल्याने बेलदार समाजात आक्रोश.
बल्लारपूर मूल :-
राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजप-महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी कर्मवीर मा. सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांचा अपमान केल्याचा खोटा प्रचार अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी सुरू केला आहे. स्वार्थी व घाणेरड्या राजकारणापोटी त्यांनी खालची पातळी गाठली असल्याचे बेलदार समाजाचे नेते, कर्मवीर कन्नमवार स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल बोरगमवार यांनी म्हटले आहे.
स्व. दादासाहेब कन्नमवार हे काँग्रेसचे नेते होते. त्यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करत भाजपाचे तत्कालीन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दादासाहेबांचे स्मारक मुल शहरात उभारले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी मोठे सभागृह बांधले. दादासाहेबांविषयीचा आदर सुधीर मुनगंटीवार यांनी वेळोवेळी व्यक्त केला आहे. विधानसभेतली सुधीर मुनगंटीवार यांची भाषणे याची साक्षीदार आहेत. या स्मारकासाठी, सभागृहासाठी संसदीय संघर्ष करून त्यांनी रू. ८ कोटी निधी खेचुन आणला. डॉ. गावतुरे यांनी विधानसभेतला रेकॉर्ड तपासावा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करावी. मात्र मतांच्या लाचारीसाठी इतके खालच्या पातळीवर जाऊ नये, असेही बोरगमवार यांनी म्हटले आहे.
‘सुधीर मुनगंटीवार यांचे भाषण आम्ही ऐकले. त्यात काहीही आक्षेपार्ह नाही. डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी या खोटारडेपणा बंद करावा व आपल्या स्वार्थासाठी नेत्यांचे अवमुल्यन करणे बंद करावे,’ असेही अनिल बोरगमवार यांनी म्हटले आहे.