चिन सरकारने मागितली डॉ.ली यांच्या परिवाराची माफी !
कोरोना वार्ता :-
चिन मधे कोरोना व्हायरससंबंधी सर्वप्रथम माहिती देणाऱ्या डॉक्टर ली वेनलियांग यांच्या मृत्यूनंतर चीन सरकारने त्यांच्या कुटुंबीयांची जाहीर माफी मागितली आहे. ली यांनी जगाला करोनाचा धोका असल्याचे सार्वजनिक केल्याने चीन सरकारने त्यांच्यावर कायेदशीर कारवाई केली होती. नंतर करोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे चीनने सांगितले होते. पण आता चीनने ली यांनी करोना संदर्भात दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचे मान्य करत त्यांच्या कुटुंबीयांची जाहीर माफी मागितली आहे.
डॉक्टर ली हे वुहान शहरातील सरकारी रुग्णालयात काम करत होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सात जण विचित्र तापाने फणफणल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांच्या आजाराची लक्षण पाहता ती फ्लू किंवा सार्सची नसल्याचे पण सार्सच्या वर्गवारीतील करोना व्हायरसची असल्याचे ली यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी आपली ही शंका डॉक्टरांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्यक्त केली. त्यांचा तो मेसेज व्हायरल झाला. यामुळे चीन सरकारने ली यांना गप बसण्याची धमकी देत त्यांच्यावर अफवा पसरवल्याचा आरोप ठेवत त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना अटी शर्थींवर सोडण्यात आले. पण तोपर्यंत चीनमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या हजारावर गेली. यामुळे जगभरात चीन सरकारवर टिकेची झोड उठली. त्यानंतर चीनने ली यांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे जाहीर केले. पण आता ली यांच्यावरील कारवाई व त्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी चीनने त्यांच्या कुटुंबीयांची जाहीर माफी मागितली आहे.