मुंबईच्या काही भागात कोरोना व्हायरस तिसऱ्या टप्प्यात जाण्याची शक्यता ?
कोरोना अपडेट :
राज्यात Coronavirus चा फैलाव वाढत आहे. मुंबई देशात सर्वांत मोठा कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे. आज दुपारपर्यंतच्या आकडेवारीनुसार फक्त मुंबई परिसरातच 116 रुग्ण दाखल झाले. ठाण्यात 2 रुग्ण सापडले. याशिवाय 5 रुग्णांचा मृत्यू मुंबईत झाला आहे. राज्याच्या एकूण आकड्यापैकी निम्म्याहून अधिक रुग्ण मुंबईतच आहेत. मुंबईत आतापर्यंत 590 रुग्ण दाखल झाले आहेत. ही दुपारी 2 वाजेपर्यंत झालेल्या नोंदींची आकडेवारी आहे.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 1018 वर पोहोचली आहे. आज एका दिवसात 150 रुग्णांची भर पडली. त्यातले 116 जण मुंबईतलेच आहेत. मुंबईतल्या या 116 पैकी 55 रुग्ण आधीच प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातले आहेत. त्यामुळे मुंबईच्या काही भागात धोका वाढला आहे. आज मुंबईत दाखल असलेल्यांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला. यातले 4 जण इतरही काही आजारांनी ग्रस्त होते आणि 1 रुग्ण वयोवृद्ध होता, अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे.
मुंबईच्या या काही ठराविक भागात कोरोनाव्हायरसच्या साथीने तिसरा टप्पा गाठल्याचा संशय आहे. AIIMS च्या संचालकांनी या हॉटस्पॉटमध्ये हा व्हायरस कम्युनिटी स्प्रेडच्या टप्प्यात असल्याचं सांगितलं होतं.
कोरोनाग्रस्तांची आज नोंदली गेलेली संख्या
मुंबई 116, पुणे 18, अहमद नगर 3, बुलढाणा 2
ठाणे 2, नागपूर 3, सातारा 1, औरंगाबाद 3,
रत्नागिरी 1, सांगली 1
एकूण – 150
राज्याची आतापर्यंतची संख्या – 1018
पुण्यालाही धोका
दुसरीकडे पुण्यातही कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. याचं आज भयावह चित्र पुण्यात पाहण्यास मिळाले. अवघ्या 2 तासांत 3 जणांचे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर 12 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. पुण्यात आज सकाळी दोन तासातच 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या तिन्ही रुग्णांचे वय हे 60 वर्षांपुढील असून त्यापैकी दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होत होता. कोरोनामुळे पुण्यात झालेल्या मृतांचा आकडा आता 8 झाला आहे. तर दिवसभरात 12 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. त्यामुळे पुण्यावरच कोरोनाच संकट गडद होत चाललं आहे.