१० जानेवारीचे ठरले होते लग्न मात्र वधूचे अपघातात दुःखद निधन दोन्ही कडील परिवारात शोककळा.
वरोरा प्रतिनिधी :-
आनंदचा क्षण असताना दुःखाचे डोंगर कोसळले तर अश्रूंचे बांध फुटतात अगदी असाच दुःखद प्रसंग उमरेड येथिल सुखचंद नंदेश्वर ह्यांच्या कुटुंबीयांवर ओढवला असून आनंद निकेतन कृषी महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक डॉ नीलिमा या तरूणीचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, 7 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली.
नीलिमा या प्राध्यापक मुलीचा विवाह ठरला, निमंत्रण पत्रिका वाटल्या आणि विवाहाला अवघे तीन दिवस उरले असताना हळद लागण्याच्या पूर्वीच काळाने झडप घातल्याने त्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला
येथील आनंद निकेतन कृषी महाविद्यालयात डॉ. निलीमा नंदेश्वर या सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्या उमरेड येथील रहिवासी होत्या. काही महिन्यापूर्वी त्यांचा विवाह नागपूर येथील डॉ. अश्विन खेमराज टेंभेकर यांच्याशी 10 जानेवारीला निश्चित झाला होता.
वर-वधू पक्षांनी विवाहाच्या निमंत्रण पत्रिका वाटल्या. घरात लग्नाची लगबग सुरू झाली. डॉ. निलीमा विवाहाच्या तयारीकरिता रजेवरही गेल्या. गुरुवारला चे प्रात्यक्षिक गुण देण्याकरिता त्या आपल्या वेत चारचाकी वाहनाने वरोरा कडे येत होत्या. यावेळी डॉ. निलीमा स्वतः वाहन चालवीत असताना उमरेड-गिरड मार्गावरील पाईकमारी गावाजवळील वळणावर वाहन अनियंत्रित झाले व रस्त्याच्या बाजूला उलटले. यात डॉ. निलीमा आणि त्यांची आई गंभीर जखमी झाल्या. त्यांना हिंगणघाट येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉ. निलीमा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सदर घटनेने दोन्ही परिवारात शोककळा पसरली. वधू होऊन सुखी संसाराचे स्वप्न रंगवलेल्या डॉ. निलीमा यांच्या अशा अपघाती मृत्यूने त्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. हळद लागण्याच्या तीन दिवसापूर्वी काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे.