ऑनलाईन जुगार चालविणाऱ्या मालकांवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल.
भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :-
आज सगळीकडे ऑनलाईन जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असून कमाईचे पैसे जुगारात हरल्याने परिवारात होणारे झगडे व त्यामुळे मनावर परिणाम झाल्याने आत्महत्या करण्याचे प्रकार हा नीत्याचाच प्रकार होत आहे मात्र अशावेळी जुगार चालविणाऱ्यावर मात्र कुठलीही कारवाई होत नव्हती परंतु त्र्यंबकेश्वर पोलिसांनी ऑनलाईन जुगार चालविणाऱ्या मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून खळबळ उडवून दिली आहे.
रोलेट’या ऑनलाईन जुगाराच्या आहारी जाऊन त्र्यंबकेश्वरमध्ये काही दिवसांपूर्वी एका ३६ वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी थेट‘रोलेट’जुगार चालविणार्या संशयित कैलास शहा याला अटक केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा कैलास शहा व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. जुगारात शेकडो लोकांनी आपले सर्वस्व गमावले आहे. मात्र, अशा प्रकारे जुुगारचालकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा प्रथमच दाखल झाला आहे.
नाशिक शहरासह ग्रामीण भागात असंख्य तरुण ‘रोलेट’ नावाच्या जुगाराच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. या जुगारामध्ये लाखो रुपये गमावावे लागल्याने त्यातून नैराश्य आल्याने नामदेव चव्हाण याने आत्महत्या केली होती. त्र्यंबकेश्वर भागातील आंबोलीमध्ये एका महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यात शहा याचा ग्रामीण पोलीस अनेक दिवस शोध घेत होते. अखेर त्याला नाशिकमधून ताब्यात घेण्यात बुधवारी रात्री यश आले. याबाबत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले की, कैलास शहा याच्याविरुद्ध ३०६ प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.