मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यानंतर सुद्धा कोरोना संसर्ग वाढतो ही बाब चिंताजनक.
न्यूज नेटवर्क:-
जगात कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण सुरू आहे. मात्र यानंतरही कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे ह्या कोरोना लसीचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.आता तर या लसीकरण मोहिमेत ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाच्या लशीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे मात्र चिंता वाढवणारी बातमी समोर आली असून एस्ट्राजेनकाची लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी झाल्याने सात जणांना प्राण गमवावे लागल्याची खळबळजनक माहिती ब्रिटनच्या वैद्यकीय प्राधिकरणाने दिली आहे.
खरं तर युरोपीयन युनियनमधील काही देशांनी याच कारणांमुळे एस्ट्राजेनका लशीचा वापर थांबवला आहे. या संदर्भातील ब्रिटनच्या मेडिसिन अॅण्ड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने सांगितले की, २४ मार्चपर्यंत लस घेतल्यानंतर रक्ताची गाठ तयार झाल्याचे ३० प्रकरणे समोर आली. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये १.८१ कोटी डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी ३० प्रकरणे समोर आली आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या डेटानुसार लशीचे फायदे अधिक असून नुकसान कमी आहे. त्यामुळे लशीचा वापर सुरूच ठेवला पाहिजे असेही अधिकाऱ्याने म्हटले. लस आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याचा काही संबंध आहे का, याचाही शोध घेतला जात असल्याचे प्राधिकरणाने सांगितले. तर, फायजर-बायोएनटेक लशीबाबत असे कोणतेही वृत्त समोर आले नसल्याचे बोलल्या जात आहे.
मागील महिन्यातच काही युरोपीयन देशांनी एस्ट्राजेनका लशीच्या वापरावर स्थगिती आणली. डेन्मार्क, जर्मनी, ऑस्ट्रिया यांसह युरोपीयन युनियनमधील काही देशांमध्ये एस्ट्राजेनकाची लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी तयार होत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या देशांनी लस वापराला तात्पुरती स्थगिती दिली होती.