Home राष्ट्रीय लक्षवेधी:- कसलं स्वातंत्र्य आणि कसलं काय? हा तर आर्थिक सामाजिक आणि राजकीय...

लक्षवेधी:- कसलं स्वातंत्र्य आणि कसलं काय? हा तर आर्थिक सामाजिक आणि राजकीय गुलामगिरी चा काळ?

 

स्वराज्य मिळवलं पण सुरज्य कुठे आहे? देशात नव्या क्रांती ची गरज.

लक्षवेधी:-

“जहाँ डाल डाल पे सोने की चिडिया करती है बसेरा. वो भारत देश है मेरा” असे गाणे खरं तर स्वातंत्र्य प्राप्ती नंतर प्रत्त्येक स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ऐकायला मिळते पण देश प्रेमाने झपाटलेले किती लोक याच आकलन करताहेत हेच मुळात कळत नाही. विसाव्या शतकात या देशाने गुलामी विरुध्द लढा दिला. भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्ष झाली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारी, स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वराज्य मिळवण्यासाठी टिळक, गांधी, पटेल, सुभाषचंद्र बोस या महापुरुषांच्या नेतृत्वाखाली अनेक जण स्वातंत्र्याच्या लढाईत धारातीर्थी पडले, देशासाठी आपलं बलिदान दिलं. स्वराज्याचं स्वप्न अखेर १५ ऑगस्ट १९४७ साली सत्यात उतरलं. ब्रिटिश राजवटीतून भारत स्वतंत्र झाला.
स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येला पंडित नेहरुंनी दिलेल्या भाषणात भारताने स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्षमयी प्रवास उलगडला आणि त्याबरोबरच भारताने आपलं स्वातंत्र्य परत मिळवल्याचं जगाला सागितलं. भारत जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते.

भारतात असलेल्या सांस्कृतिक तसेच धार्मिक विविधतेमुळे भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा अनेकांनी भारत हा देश एकसंध राहणार नाही असे भाकित वर्तवले होते. परंतू विविधतेत एकता हेच भारताचे वैशिष्ठय ठरले आणि आज ७४ वर्षाच्या स्वातंत्र्यतोत्तर वाटचालीत भारताच्या एकात्मतेला कुठेही तडे गेले नाहीत. (अपवाद काही धार्मिक संघटना) भारताने तंत्रज्ञान, विज्ञान, शेती, शिक्षण असा विविध क्षेत्रात प्रगती केली. आज भारताकडे स्वत: चा आण्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं म्हटलं जातं. पण आज देशात ज्या पद्धतीने सरकार चाललंय ते भारताला जणू अराजकतेकडे घेऊन जात आहे असे जणू वाटायला लागले आहे. या देशात महात्मा गांधीच्या सत्याग्रही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना खलिस्तानी पाकिस्तानी संबोधले जाते त्यांच्या घटनादत्त अधिकाराला पायदळी तुडवल्या जात आहे. मोठमोठी आश्वासने देवून शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देऊ म्हणणाऱ्या सरकारकडून शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान मूल्य दिल्या जात नाही. सरकारी संस्थांचे खाजगीकरण करून सरकारी नौकऱ्या संपवल्या जात आहे. देशातील ब्यांका लुटणाऱ्यांना सरकार कडून सरक्षण मिळतंय आणि सर्वसामान्य जनतेकडून सक्तीची कर्ज वसुली होतेय. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढून महागाई आपली सर्वोच्य सीमा ओलांडत आहे, सरकार पेट्रोल डिझेल व घरगुती गैस च्या किमती वाढवून जणू सर्वसामान्य जनतेच्या खिशात दरोडा टाकत आहे. त्यामुळे एकेकाळी सुखी संपन्न समजला जाणारा देश आता राजकीय हिटलरशाही मुळे रसातळाला जाणार असे संकेत मिळत आहे, मग स्वातंत्र्य मिळवून आपण साध्य का केलं? हेच समजायला मार्ग नाही, खरं पाहता इंग्रजांनी देशात रेल्वे आणली देशात सुख सुविधा व इतर प्रशासन निर्मिती केल्या व त्यासाठी मोठ्या वास्तू तयार केल्या,आजही त्याच वास्तूत आपले प्रशासन चालत आहे. त्यामुळे भारतीय सत्ताधारी ज्या पद्धतीने देशात प्रगती होत असल्याच्या थापा मारताहेत त्या मानाने भारत विविध समस्यांनी वेढला गेला आहे. स्वातंत्र्याची खूप मोठी किंमत आपण दिली आहे. ब्रिटिश राजवटीतून आपण कधीच मुक्त झालो. पण महागाई, दहशतवाद, भ्रष्टाचार, स्वैराचार यात मात्र अडकलो आणि यातून दिवसेंदिवस बाहेर पडणं कठीण होत चाललयं. परदेशियांशी लढणं सोपं आहे पण स्वकियांशी तितकच कठीण हे आता स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७४ वर्षानंतर कळायला लागलं आहे.

आपल्या देशात महान आणि तडफदार नेते, राजकारण्यांचा इतिहास आहे. पण खेद याचा वाटतो की, या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली आहे, कारण आज आपल्या देशात भ्रष्टाचार एवढा बोकळला आहे, स्टॅम्प पेपरपासून ते चारा घोटाळा, राफेल पासून तर नोटाबंदी चा घोटाळा या सारख्या अनेक घोटाळ्यांनी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात घालून आपली घोटाळ्यांची परंपरा सुरू असणे ही अत्यंत शरमेची बाब आहे. घोट्याळ्यांची व्यापकता आणि विविधता राखण्यात मात्र त्यांनी सातत्य राखलं. राष्ट्रपिता गांधीजींच्या अहिंसेच्या चळवळीपुढे ब्रिटिशांनाही झूकावं लागलं. गांधीजींच्या तत्वज्ञानाचा जगभरात आजही पुरस्कार केला जातो. पण आज त्याच गांधीजींच्या देशात त्यांच्याच तत्वज्ञानावर आधारलेलं शेतकऱ्यांच आंदोलन चिरडलं जातं ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. महागाई, भ्रष्टाचार, दहशतवाद यांची झळ बसणारा सामान्य माणूस बोथट झाला आहे. किती आणि कोणाला प्रतिकार करणार म्हणून एकतर सहन करणं नाहीतर विसरणं असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. याशिवाय ते जगूच शकत नाही. हिंसाचार दररोज होताना दिसत असतो. देशातल्या जनेतेच्या सहनशक्तीला खरच दाद दयायला हवी. आपल्या देशातल्या राजकारण्यांना जनतेचे प्रश्न सोडविण्याची मानसिकता आहे का? असा प्रशन समूह संपर्क माध्यमातून लोक विचारु लागले आहेत. आर्थिक महासत्तेची स्वप्न बघणार्‍या भारतात दारिद्रय रेषेखालील जनेतेला अन्न, निवारा या जीवनाश्यक गोष्टीची भ्रांत आहे. आपल्या तिरंग्यातील तीन रंग शांतता, सामर्थ्य, सुबत्ता यांचे प्रतिक आहेत. भगवा सामर्थ्याचं, पाढंरा शांततेचं आणि हिरवा सुबत्तेचं. आज तिरंगा फडकवताना मनात येतं की खरचं भारतात शांती आहे? महासत्ता बनण्याचे सामर्थ्य आहे का? शेतकर्‍यांच्या आत्महत्या होणार्‍या कृषीप्रधान भारतात सुबत्ता आहे का ? खरं तर आज स्वातंत्र्य दिन नागरिकांसाठी बॅंक हॉलिडे झाला आहे.

खरंच स्वातंत्र्याची किंमत कधी कळणार का आपल्याला. कदाचित आपण आणखी १ वर्षांनी स्वातंत्र्यपुर्तीची ७५ वी धुमाधडाक्यात साजरी करु पण तेव्हा चित्र खरेच पालटले असेल का? याची तूर्तास शक्यता नाही. आजचे स्वातंत्र्य यथेच्छ उपभोगणा-या एकविसाव्या शतकातील भारतीयांना स्वातंत्र्यदिनी शुभेच्छा देताना हा केवळ सुटीचा दिवस नाहीतर देशाला आणखी विकसित करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे याची जाणिव द्यायला हवी. कारण आपण स्वराज्य मिळवले पण सुराज्य मिळवणे अजून बाकी आहे. हा देश जणू  सामाजिक आर्थिक आणि राजकीय गुलामगिरीत अडकून जगातआपल्या लाचारीची लक्तरे वेशीवर टांगत आहे त्यामुळे कसलं स्वातंत्र्य आणि कसलं काय हा तर आर्थिक सामजिक आणि राजकीय गुलामगिरी चा काळ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

Previous articleखळबळजनक :- प्रियकराने धारदार शस्त्राने वार करून केला प्रेमीकेचा खून.
Next articleखळबळजनक :- पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे यांच्या आत्महत्तेने संपूर्ण महाराष्ट्रात उडाली खळबळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here