Home वरोरा वरोरा तालुक्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करा.

वरोरा तालुक्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करा.

जिल्हा मध्यवर्ती बैंकेचे संचालक रवींद्र शिंदे यांची सेवा सहकारी संस्थां अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या मेळाव्यात मागणी.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यात संततधार पावसामुळे आलेला पूर व त्या पुरामुळे उभ्या शेतपिकांचे झालेले नुकसान शेतकऱ्यांना संकट निर्माण करणारे असून पीक कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी जी पेरणी केली ती पूर्णता नष्ट झाल्याने व काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले असल्याने मोठे नुकसान झाले त्यामुळे आता नव्याने बियाणे घ्यायचे कसे ? हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे त्यामुळे पूर पिडीत शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे व शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देण्यात यावे अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती बैंकेचे संचालक रवींद्र शिंदे यांनी विविध सेवा सहकारी संस्थां अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या मेळाव्यात केली आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळण्याच्या दृष्टीने दि.३ ऑगस्ट ला स्थानिक वरोरा येथील बावणे मंगल कार्यालय येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवि शिंदे, दत्ता बोरेकर, भास्कर ताजने, धनराज आस्वले तथा तालुक्यातील सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी व शेतकरी बांधव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत जुने पीक कर्ज माफ होऊन नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, या विषयावर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील सहकारी संस्था या मागणीचे ठराव घेणार असून ते जिल्हाधिकारी मार्फत राज्य शासनाला पाठविणार आहेत.

गेल्या महिन्यात झालेल्या अतीवृष्टीने तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. तालुक्यातील नदी-नाल्या शेजारील अनेक गावातील शेतपिके पुराने वाहून गेली. शेतातील माती उखळून गेली. परिणामी शेतकऱ्यांची दैनावस्था झाली आहे. या बैठकीत अनेक शेतकऱ्यांनी आपआपल्या समस्यांना वाचा फोडली व शासनाकडून मदतीची अपेक्षा केली आहे. शेंबळ येथील शेतकरी अरुण खारकर, तुळाना येथील शेतकरी आशीष ठेंगणे यांनी म्हटले की, शासनाने सरसकट कर्जमाफी द्यावी तथा नियमित कर्ज भरणार्यांना मागील वर्षीचे ५० हजार रु. अनुदान त्वरीत देण्यात यावे. खांबाळा येथील शेतकरी प्रकाश शेळकी म्हणाले की, ओला दुष्काळ जाहीर करुन जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करावी. आमडी येथील शेतकरी गोपाळ ढवस म्हणाले की, शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते उपलब्ध करुन द्यावे तथा शेतात पडलेले इलेक्ट्रिक खांब सरळ उभे करुन विज पुरवठा त्वरीत पूर्ववत करावा. बेंबळ येथील शेतकरी दयाराम नन्नावरे म्हणाले की शेतीपूरक व्यवसायाकरीता शेतकऱ्यांनी कर्ज काढले, मात्र ओल्या दुष्काळामुळे शेतकरी कर्ज भरु शकणार नाही. सरसकट कर्जमाफी आवश्यक आहे. सोबतच जंगलव्याप्त शेतीला सौर कुंपण करून द्यावे. मारडा येथील शेतकरी धनंजय पिंपळशेंडे म्हणाले की आपल्याकडे शेतकरी खरीप व रब्बी पिके घेतात तर खरीप पिकांना मिळते तसे रब्बी पिकांना देखील पीक कर्ज पुरवठा करण्यात यावा.
यावेळी शेतकऱ्यांनी समस्यांचा पाढाच वाचला, तेव्हा काहींना सभागृहात अश्रू आवरता आले नाही. आता हे सर्व शेतकरी राज्य शासनाकडे आस लावून बसले आहेत.शेतकऱ्यांना जमेल तेवढे सहकार्य करत राहू, प्रशासनाला तगादा लावून मागण्या मंजूर करण्यासाठी बाध्य करु, असे यावेळी रवि शिंदे म्हणाले.

वरोरा तालुका येते बावणे मंगल कार्यालय वरोरा येथे, पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळण्याच्या दृष्टीने तसेच त्यांचे पीक कर्ज माफ होऊन त्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी वरोरा तालुक्यातील सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व पदाधिकारी शेतकरी बाधव यांच्यासोबत चर्चा व शासन दरबारी मागणी करिता रणांगण रणनीती आखण्यात आली.

Previous articleखळबळजनक – चंद्रपूर जिल्ह्यात नकली सुगंधीत तंबाखू व पानमसाल्याची सर्हास विक्री ?
Next articleधक्कादायक :- विजेचा पुनः कहर चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून दोन ठार तर एक जखमी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here