परिसरातील ऐकोना, चरुरखटी,वनोजा व मार्डा या बाधित गावातील नागरिकांचा वेकोलि प्रशासनाविरोधात रस्ता रोको आंदोलन.
वरोरा प्रतिनिधी :-
वरोरा तालुक्यातील वेस्टर्न कोल लिमिटेड माजरी अंतर्गत येणाऱ्या एकोना या खुल्या खाणीच्या विरोधात विविध समस्या व तक्रारी घेऊन तब्बल 27 गावातील नागरिकांनी एल्गार पुकारला असून येत्या २४ नोव्हेंबरला वरोरा माढेळी मुख्य रस्त्यांवरील चरुरखटी चौकात कोळसा खाणीतून होणारी कोळसा वाहतूक बंद करण्याचा इशारा दिल्याने वेकोलि प्रशासन आता कोणती भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
वेकोलि प्रशासनाने भूमी अधिग्रहण करण्यापूर्वी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण केले नाही उलट परिसरातील गावांच्या नागरिकांना प्रदूषण दिले व खदानीत होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे या परिसरातील घरांना तडे जातं आहे व या परिसरातील जनता जणू भूकंपाचा अनुभव करत आहे. या संदर्भात एकोना कोळसा खदान संघर्ष समितीचे अध्यक्ष व एकोना ग्रामपंचायतचे सरपंच गणेश चवले, समितीचे सचिव योगिता पिंपळशेंडे (मार्डा), उपाध्यक्ष चंद्रकला वनसिंगे(चरूरखटी), सचिन बुरडकर (वनोजा), शालू उताणे, विजेंद्र वानखेडे यांचेसह अनेक सरपंचांनी आंदोलनाचा इशारा वेकोलि प्रशासन, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व स्थानिक तहसीलदार यांना दिला आहे.
वेकोलि प्रशासनाकडून गावकऱ्यांचा भ्रमनिरास ?
सन 2015 मध्ये कोळसा खाण सुरू झाली. त्यावेळी वेकोलीने एकोना, वनोजा, चरूरखडी,मार्डा या गावातील जमिनी भूसंपादित केल्या होत्या. त्यावेळी गाववासियांना विविध आश्वासन देण्यात आले.यात शेतमजुरांना पण काम देण्यात येईल असेही वेकोलीने म्हंटले होते.प्रत्यक्षात असे होत नसून आता ब्लस्टिंगमूळे घराला तडे जात आहे.ओव्हर बर्डनमूळे उर्वरित शेती पावसाळ्यात बुडू लागली आहे.कोळसा वाहतूक मूळे रस्ते पण खराब झाले असून अपघाताची शक्यता वाढत चालली आहे.ग्रामस्थांचे प्रश्न अनेकवेळा शासन दरबारी व वेकोलीपुढे मांडण्यात आले पण उपयोग झाला नाही,म्हणून आता मागण्या पूर्ण होत पर्यंत २४ नोव्हेंबरला माढेळी रोड वरील चरूर पाटी येथे वाहतूक अडवून आंदोलन करण्यात येईल असा इशारा ऐकोना ग्रामपंचायत सरपंच गणेश चवले यांच्यासह एकूण २७ गावातील सरपंच व सदस्यांनी दिला आहे.
काय आहेत नेमक्या गावकऱ्यांच्या मागण्या ?
ऐकोना कोळसा खाणीत होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे अनेक गावातील घरांना भेगा पडल्या आहेत. अश्या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे. गावांसाठी ॲम्बुलन्स, अग्निशामकाची व्यवस्था करावी. गावातील रस्त्यांचे सिमेंटिकरण करावे, स्ट्रीट लाईट लावावे, स्थानिक गावातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्याव्या, सीएसआर फंड निधी अंतर्गत गावाचा पायाभूत विकास करावा. ग्रामपंचायत एकोना यांसह चरुरखटी मारडा व वनोजा या गावाला खनिज निधी उपलब्ध करून द्यावी. खदान मधील होत असलेल्या विस्फोटाने गावातील घरांना भेगा पडल्या आहेत त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी. परिसरात होत असलेल्या प्रदूषणावर कंपनीने नियंत्रण करावे. कंपनीत नियुक्त कार्यरत महालक्ष्मी तथा अरुणोदय कंपनीने स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.आदी मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहे.