Home वरोरा खळबळजनक :- वरोरा विधानसभा क्षेत्रात भाजपच्या संभावित उमेदवारांची का होणार राजकीय आत्महत्या?

खळबळजनक :- वरोरा विधानसभा क्षेत्रात भाजपच्या संभावित उमेदवारांची का होणार राजकीय आत्महत्या?

जो तो मलाच उमेदवारी मिळणार म्हणून सांगतोय. पण अगोदर भाजपच्या वाट्याला हा मतदारसंघ येईल कां?

लक्षवेधी:-

राजकारणात कधी काय होईल हे निश्चितपणे सांगता येतं नाही, कारण राजकारण हे हवामानाच्या अंदाजानुसार असते, कधी कुठे कुणाची हवा होईल आणि कुणी कधी हवेत उडून जाईल याचा नेम नसतो. पण काही राजकीय व्यक्ती अशा असतात की त्यांचा त्यांच्या भावी निर्णयावर प्रचंड विश्वास असतो, मग त्यात त्यांची राजकीय कारकीर्द संपली तरी चालेल पण ते कधी भविष्यातील संभावित धोक्याचा विचार करत नसतात आणि मग ऐन वेळेवर तोंडघशी पडत असतात, असाच एक राजकीय परिपाठ वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात बघायला मिळत आहे. कधी कुठली सामाजिक बांधिलकी जपली नाही, कधी कुणाच्या जीवनात प्रकाशाची पणती पेटवली नाही, एवढेच काय धड आपले मत लोकांना पटविण्यात व प्रशासनाकडे मांडण्यात जे असमर्थ आहे अशा डझनभर राजकीय व्यक्तींनी आपण समोरचे आमदार म्हणून अप्रत्यक्षपणे दंड थोपटले असल्याचे चित्र दिसत आहे.

वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघात सद्ध्या भाजपकडे संभावित उमेदवारांची एक लंबी लाईन आहे, जिथे खरं तर भाजपचा उमेदवार लढेल अशी संधीच दिसत नाही आणि तूर्तास हा मतदारसंघ भाजप च्या वाट्याला जाईल अशी शक्यता पण नाही, कारण राज्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेना अजित पवार चा राष्ट्रवादी सोबत असल्याने किमान या विधानसभा क्षेत्रात एकनाथ शिंदे ची शिवसेना आपला मोठा दावा करेल नाहीतर अजित पवार गट आपला जोर लावेल. परंतु इच्छुक उमेदवारांना वाटतंय की भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे आणि या पक्षाची उमेदवारी मिळाली तर निवडणुकांसाठी भाजप कडून येणारा प्रचंड पैसा आणि रेडीमेड कार्यकर्ते यामुळे भाजप मधून लढल्यास आमदार बनण्यासाठी जास्त मेहनत आणि पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही. खरं तर असा समज भाजप मधील संभावित इच्छुक उमेदवारांना असावा आणि म्हणूनच इथेच आमदार बनण्याची संधी समजून संभावित इच्छुक उमेदवारांचा भाजप च्या नेत्यांकडे आपल्यां चपला जुते झिजविन्याचा पोरखेळ सद्ध्या जोरात सुरू आहे.जो तो मलाच भाजप ची उमेदवारी मिळणार म्हणून सांगतोय पण या मतदारसंघात महायुतीत भाजपच्या वाट्याला उमेदवारी येईल का? हा खरा प्रश्न निर्माण झाला असुन जे भाजपाकडून संभावित इच्छुक उमेदवार मोठी आस लावून आहे त्यांची राजकीय आत्महत्याच होईल असेच राजकीय चित्र आहे.

कोण कोण आहे भाजपचे संभावित इच्छुक उमेदवार?

भाजप मध्ये या मतदार संघात अनेक दावेदार आहे. त्यात पहिल्या क्रमांकात येते ते ओम मांडवकर ज्यांची संधी सन 2014 मध्ये हुकली. खरं तर भाजप सेना युती तुटली तेंव्हा भाजप चा उमेदवार म्हणून ओम मांडवकर यांच्या नावाची घोषणा झाली होती आणि निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी त्यांच्या समर्थकांकडून सुरू होती, पण ऐन वेळेवर संजय देवतळे यांना काँग्रेस ने उमेदवारी नाकारत डॉ. आसावरी देवतळे यांना काँग्रेस ची उमेदवारी दिली आणि संजय देवतळे यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांच्या माध्यमातून ऐन वेळेवर भाजप चा एबी फॉर्म मिळवला आणि ते भाजप चे उमेदवार ठरले आणि ओम मांडवकर यांना भाजप नेत्यांनी थांबण्यास सांगितले दरम्यान ते आमदार होता होता राहून गेले. आणि संजय देवतळे यांनी बंडखोरी केली म्हणून त्यांना पाडण्यात आले. मात्र त्या वेळी नरेंद्र मोदींची म्हणजे भाजपची लॉट होती आणि जर ओम मांडवकर हा नवीन चेहरा म्हणून भाजप ने दिला असता तर ते आमदार सुद्धा झाले असते. भाजप मध्ये दुसऱ्या क्रमांकाची उमेदवारी आहे ती करण देवतळे यांची. कारण त्यांचे वडील संजय देवतळे यांनीच भाजप ला या विधानसभा मतदार संघात ओळख मिळवून दिली. भाजप ला वरोरा भद्रावती विधानसभा मतदार संघात कधीही दोन आकडी नगरसेवक व पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आणता आले नव्हते ती किमया संजय देवतळे यांच्यामुळेचं साधता आली हे सत्य आहे आणि करण देवतळे हे ज्या वयाचे आहे त्याच वयात संजय देवतळे हे वरोरा भद्रावती मतदार संघात काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते त्यामुळं करण देवतळे यांना भाजपची उमेदवारी मिळू शकते. तिसrरा क्रमांक लागतो ते माजी नगराध्यक्ष अहतेशाम अली, माजी मंत्री संजय देवतळे यांचा प्रॉपर्टीचा आर्थिक कारभार सांभाळता सांभाळता केंव्हा ते धनकुबेर बनले व वरोरा नगरपरिषदचे नगराध्यक्ष झाले याचा पताही लागला नाही असे अहेतेशाम अली भाजप कडून विधानसभा लढण्यास सज्ज आहे. त्यानंतर डॉ अंकुश आगलावे यांlचा क्रमांक लागतो कारण ते मागील अनेक वर्षांपासून भाजप मध्ये काम करत आहे व सतत जय गुरुदेव चा नारा देत या विधानसभा मतदार संघात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अनुयायीच्या माध्यमातून जनसमर्क सुरू आहे. त्यानंतर डॉ. वझे हे प्रामुख्यानं भाजप चे सशक्त उमेदवार म्हणून पुढे येतं आहे. ते तरुण तडफदार असल्याने व त्यांच्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून व यांच्या सामाजिक उपक्रमातून जनतेत आपले नावलौकिक मिळवून असल्याने त्यांचा विचार सुद्धा भाजप चे वरिष्ठ करू शकतात. त्यातच आता किशोर टोंगे नावाचं वादळ सद्ध्या या विधानसभा मतदार संघात घोंगावत आहे व ते सुद्धा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत उठाबैठका करत असल्याने ते सुद्धा भाजपच्या संभावित इच्छुक उमेदवारांच्या यादीत आपले स्थान बळकट करून आहे आणि त्यांना सुद्धा भाजप उमेदवारी देईल म्हणून ते कामाला लागले आहे.

आता या सर्वात महत्वाचा इच्छुक उमेदवार म्हणजे नुकतेच भाजप मध्ये गेलेले रमेश राजूरकर. मनसेच्या तिकिटावर मागील 2019 मध्ये जवळपास 35 हजार मतदान घेतल्यानंतर त्यांना जणू वाटायला लागले की ते 35 हजार मतदान त्यांचे स्वतःचे आहे आणि भाजप ने उमेदवारी दिली तर ते निवडून येईल. पण आश्चर्याची बाब म्हणजे जेंव्हा रमेश राजूरकर हे निवडणुकीला उभे होते ते ज्या वार्डात राहतात त्या वार्डात सुद्धा त्यांना कुणी ओळखत नव्हतं मग इतर गावागावाची व शहरातील वार्डात काय परिस्थिती असेल याचा विचार न केलेलाच बरा. पण ज्यांना लोक ओळखतचं नव्हते त्यांना मिळालेले 35 हजार मतदान त्यांना कशाच्या बळावर मिळाले ? हा प्रश्न अनुत्तरित आहे. पण ते भाजप मध्ये गेले आणि आपल्यालाच भाजप ने जणू उमेदवारी जाहीर केली या तोऱ्यात ते “मुंगेरिलाल के हसीन सपने” या जगात तल्लीन होऊन आहे. कारण भाजप च्या नेत्यांना अगोदर लोकसभा जिंकण्यासाठी जी सामाजिक रणनीती करायची होती त्यात रमेश राजूरकर यांचा कसा वापर करून घ्यायचा यासाठी त्यांना विधानसभा प्रमुख बनविल्या गेलं हे राजूरकर यांच्या डोक्यात बसलं नसावं.. खरं तर या संभावित सगळ्या उमेदवारांचा विचार करत असतांना यामध्ये एक मोठं नाव भाजप च्या लिस्टमध्ये कायम राहणार आहे ते म्हणजे डॉ. अनिल बुजोने. खरं तर अनिल बुजोने म्हणजे चालतं फिरत व्यासपीठ आहे. त्यांचे कार्यकर्ते आजही या विधानसभा क्षेत्रात त्यांना मानतात त्यामुळं त्यांनी आजही जर निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली तर ते अगदी काही महिन्यातच आंदोलनाचा व कार्यक्रमाचा धडाका करून पक्षाला नवसंजीवनी देतील व पक्षाचं वातावरण निर्माण करतील यात दुम्मत नाही. जेंव्हा ते अपक्ष निवडणूक लढले होते तेंव्हा त्यांनी तब्बल 42 हजार मतदान घेतले होते पण आता ते स्वतःच जणू एकांतवासात गेले की काय ? असे चित्र दिसत आहे.

भाजपची हवा गुल?

सद्ध्या देशात आणि राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सतत खोटं बोलण्याने व महागाई, बेरोजगारी हे ज्वलंत विषय बाजूला करून हिंदू मुसलमान व भारत पाकिस्तान असले विषय गोदी मिडियाच्या माध्यमातून जनतेसमोर ठेऊन सर्वसामान्य जनतेत संभ्रम निर्माण केल्या जातं असल्याने भाजपच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. अशातच भाजप ने कुटील डाव खेळून शिवसेना व त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पाडून राजकारणाचा चोथा केल्याने भाजपची हवा गुल झाली असुन भाजप उमेदवारांना जनता पसंती देईल अशी शक्यता फार कमी आहे, मोदी शहा व फडणवीस यांच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला जणू पायदळी तुडवलं जातं आहे.एकीकडे शेतकरी अस्मानी सुलतानी संकटात सापडला असतांना त्यांना मदत देण्यासाठी या सरकारकडे पैसे नाही, तत्कालीन फडणवीस सरकारने घोषित केलेली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजना सन 2017 च्या यादीत पात्र काही शेतकऱ्यांना अजूनपर्यंत कर्जमाफी झाली नाही. आता झालेल्या अतिवृष्टी व दुष्काळ चे पैसे मिळाले नाही त्यामुळं या सरकारवर शेतकऱ्यांचा रोष आहे आणि म्हणूनच भाजप ला येणाऱ्या 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनता धडा शिकवेल अशीच एकूण राजकीय स्थिती दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here