Home वरोरा सोयाबीनवर आलेल्या रोगामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा.

सोयाबीनवर आलेल्या रोगामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा.

मनसेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तहसीलदार वरोरा यांच्यामार्फत मागणी.

वरोरा :-

जिल्ह्यातील वरोरा भद्रावती तालुक्यात सोयाबीन पिकांवर आलेल्या करपा व बुरशीजन्य लाल्या रोगामुळे सोयाबीन चे पीक उध्वस्त झाल्याने या पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्या अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार वरोरा यांच्या माध्यमातून केली आहे.

दरवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबिन पिकावर पाने खाणारी हिरवी उंटअळी, शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. यंदा मात्र या पिकावर करपा रोगाने हल्लाबोल केला असून शेंगा पूर्णता भरल्या नाही व त्या सुकून गळण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळं यावर्षी सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे व शेतकऱ्यांचा लागवडी खर्च सुद्धा निघणार नसल्याने शेतकरी फार चिंतेत आहे.

यावर्षी सोयाबीन पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली पण आता हातात आलेल्या पिकांवर करपा रोगासह बुरशीजन्य लाल्या रोगाने हल्लाबोल केला असून शेंगा सुकून गळण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता उद्भवल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. दरम्यान, करपा रोग नियंत्रणासंबंधी कृषि विभागाकडून कुठलीही उपाययोजना व मार्गदर्शन शेतकऱ्यांना झाले नाही त्यामुळं शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे.

त्यामुळे स्थानिक कृषी, महसूल व विमा अधिकाऱ्यांना या संदर्भात त्वरित निर्देश देऊन शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांवर आलेल्या रोगाची पाहणी करून व तसे पंचनामे करून शेतकऱ्यांना पीक विमा व शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई करण्यात यावी व शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करण्यात हातभार लावावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या ह्या न्यायोचित मागणीसाठी आपल्या शासन प्रशासनाविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे. जनहित कक्ष विभागाचे जिल्हा अध्यक्ष रमेश काळबांधे, विशाल देठे, राम पाचभाई, प्रशांत बदकी राजेंद्र धाबेकर. धनराज बाटबरवे, प्रतीक मुडे व तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here