कोरोना अपडेट स्पेशल :-
वैद्यकीय अहवालानंतर झाले शीद्ध, अफवांच्या बाजाराने जनतेत मात्र दहशत!
वरोरा प्रतिनिधी :-
ईराणवरून वरोऱ्यात परतलेली ती व्यक्ती कोरोना पिडीत असल्याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे संपूर्ण राज्यात पसरली व चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना ह्या व्हायरस आजाराचा रुग्ण असल्याच्या माहितीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जनता भयभीत झाली होती व वरोरा येथील तो रुग्ण कोण ? याबद्दल सर्वांना त्याबद्दल माहिती घेण्याची प्रबळ इच्छा होती मात्र ईराणवरून आलेला तो व्यक्ती कोरोना पिडीत नसल्याचे उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी जाहीर केल्यामुळे जनतेने आता सुटकेचा श्वास घेतला आहे.
चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीनंतर चीनसह जगात विविध ठिकाणी तीन हजारांवर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा जीवघेणा व्हायरस भारतात पसरला असल्याने तो वाढू नये म्हणून शासनातर्फे कोरोना बाधित देशातून भारतात येणाऱ्या सर्वांची आरोग्य तपासणी केली जात आहे. तसेच अशा संशयितांवर आरोग्य विभाग काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहे, असे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर सोमवारला इराणमधून एका धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्या वरोरा येथील एका व्यक्तीवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून असल्याचे म्हटले जात आहे.
पुढील १४ दिवस त्या व्यक्तीवर त्याच्या घरीच आरोग्य विभागाची निगराणी असणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी सांगितले होते. परंतु, बुधवारी मिळालेल्या माहितीनुसार, सदर व्यक्ती हा वरोरा येथे नसून तो आरोग्य विभागाच्या कोणत्याही देखरेखीशिवाय दिल्लीला रवाना झाला असल्याची अफवा उडाली होती, पण त्या व्यक्तीला आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून, बुधवारी वैद्यकीय अधीक्षकांनी त्या व्यक्तीची भेट घेतली आहे, व ते कुठेही बाहेर गेले नसून, शहरातच असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती व आज त्यांची पुन्हा आरोग्य तपासणी व मेडिकल रिपोर्ट तपासले असता तो कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट होत आहे.