Home भद्रावती केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन!

केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन!

सर्वसामान्यांना दिलासा द्या : तहसिलदारांना काँग्रेसचे निवेदन ।

भद्रावती :-

पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असून दररोज इंधनवाढ होतच आहे, त्यामुळे महागाईने देशातील सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून केंद्रातील भाजप सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्यात सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप खासदार बाळू धानोरकर यांनी केला. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात भद्रावती तालुका काँग्रेसतर्फे स्थानिक बस स्थानक परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर, भगतसिंग मालुसरे, वासुदेव ठाकरे, परशुराम जांभुळे, गोल्ला कोमरय्या, राकेश होंतावार, सुरज गावंडे, प्रविण बांदूरकर, भोजराज झाडे, अजीत फाळके, सरीता सुर, संतोष आमने आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे. या संकटाने लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. उद्योगधंदे अजूनही पूर्वपदावर आलेले नाहीत. बहुसंख्य जनता जगण्यासाठी धडपड करत आहे. अशा कठीण प्रसंगी पेट्रोल-डिझेलच्या महागाईने आणखी एक संकट लोकांवर ओढवले आहे. या दुहेरी संकटाचा सामना करतांना सर्वसामान्य जनतेची प्रचंड तारांबळ उडत आहे.

दिनांक ७ जून पासून इंधनाच्या दरात दररोज वाढ केली जात असून शनिवारपर्यंतची दरवाढ पाहता पेट्रोलमध्ये प्रतिलिटर ९.१२ रूपये, तर डिझेलमध्ये ११.१ रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. देशभरात पेट्रोलच्या किमती प्रतिलिटर ८७ ते ८८ रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. तर दिल्लीमध्ये डिझेल पेट्रोल पेक्षा जास्त महाग आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असतांना त्याचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही. वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीचा विचार करून देशांतर्गत इंधनाचे दर ठरवले जात असतांना सध्या ती पारदर्शकता राहिलेली नाही. सन २०१४ मध्ये पेट्रोलवर उत्पादन शुल्क हे ९.४० रूपये तर डिझेलवर ३.५८ रूपये होते. सध्या हेच शुल्क पेट्रोलवर ३२.९८ रूपये तर डिझेलवर ३१.८३ रूपये असे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती पाहता पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी करून सामान्य जनतेला त्याचा लाभ देणे सहज शक्य आहे. हे निवेदन तहसिलदारांच्या माध्यमातून देशाच्या राष्ट्रपतींना पाठविण्यात आले आहे अशी माहिती यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. या धरणे आंदोलनात तालुका काँग्रेसचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleकेंद्र सरकारच्या खाजगीकरणाच्या विरोधात वेकोली कामगारांचा एल्गार !
Next articleसप्ताह :- कृषि संजीवनी सप्ताह निमित्य  कृषी विभागाचे आसाळा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here