शेकडो हेक्टर धान पीक पाण्याच्या प्रवाहात बरबाद. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी.
वरोरा प्रतिनिधी :-
मागील एक महिन्यापासून सततधार पावसाने अगोदरच शेतकऱ्यांना आपल्या शेतात बियाणे पेरल्यानंतर फवारणी व खते देता आली नाही शिवाय धान पिकांच्या बाबतीत रोवने उशिरा करण्यात आली अशातच आता संततधार पावसाने पाण्याखाली पिके आल्याने रोपे सडली असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. आता नैसर्गिक प्रकोप तर झालाच पण वरोरा-शेगांव या सिमेंट रस्ता बांधकाम करणाऱ्या एसआरके कंपनीने चुकिच्या पद्धतीने रस्त्यादरम्यान येणाऱ्या छोट्या नाल्यांची अवस्था केल्याने आलोरी गावातील किमान 50 ते 60 शेतकऱ्यांच्या धान पिकांचे जोरदार पाण्याच्या प्रवाहाने नुकसान झाले. काही ठिकाणी तर अख्खे धानाचे परेच वाहून गेले तर काही ठिकाणी परे लावणी झाल्यानंतर ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहे.
एवढी वर्ष झाली पण अजूनपर्यंत अशा पद्धतीने धान पिकांचे नुकसान झाले नाही पण एसआरके कंपनीच्या चुकीच्या नियोजनाने शेतकऱ्यांच्या शेतपिकांना फटका बसला असल्याने शेतकऱ्यांना कंपनी कडून आर्थिक मोबदला देण्यात यावा अशी सालोरी गावातील शेतकरी कवडु रंधई, शंकर शामराव रंधई. विठ्ठल रंधई, मारोती रंधई, कुंडलिक पांडुरंग रंधई, मनोहर रंधई, मधुकर रंधई, विजय रंधई. गेडाम भाऊराव विथोबा दुरुगकर, पवन अरुण निखाते, पंचफुला अरुण निखाते,बापूराव विठोबा द्रुगकर काशिनाथ हरी मांडवकर. सुमन शामराव मुरसकर व इतर शेतकरी मागणी करत आहे.
या संदर्भात मनसे नेते रमेश राजूरकर जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे जिल्हा सचिव विनोद सोनटक्के व सालोरी मनसे शाखा कार्यकारणीचे पदाधिकारी शुभम वाकडे. रंगनाथ पवार संदीप मोरे व इतर सदस्यांनी प्रत्यक्ष शेताची पाहणी करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले व येणाऱ्या काही दिवसात जर कंपनीने मोबद्ला दिला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा पण दिला आहे.