Home वरोरा खळबळजनक :- वरोऱ्याच्या आरएफओ राठोडची तक्रार करणाऱ्या वनरक्षकावर प्राणघातक हल्ला.

खळबळजनक :- वरोऱ्याच्या आरएफओ राठोडची तक्रार करणाऱ्या वनरक्षकावर प्राणघातक हल्ला.

आरएफ़ओ राठोड कडून वनरक्षक संदीप वाटेकर यांना मारण्याची गुंडांना सुपारी?

वरोरा वन पंचनामा भाग -३

वरोरा येथील वादग्रस्त वनपरिक्षेत्र अधिकारी एम. पी. राठोड यांचे एकीकडे भ्रष्टाचाराचे बिंग फुटत असताना दुसरीकडे त्यांच्याकडून वन कर्मचारी व त्यांच्या अधिनस्त असणाऱ्या अधिकारी यांच्यावर कसा अन्याय केला जातोय व मानसिक त्रास देऊन खुनी हल्ले केले जातं आहे यांचे सुद्धा उदाहरण समोर येत आहे. काल रात्री असाच खुनी हल्ला काही गुंडांना सुपारी देऊन वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असल्याने वन कर्मचारी संघटना आता अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांच्याकडून १५ दिवसांपूर्वी टेंमुर्डा येथील वनरक्षकाला शिविगाळ करून चाकूने भोसकण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेची तक्रार पोलीसात करण्यात आली व मुख्य वन संरक्षक यांच्यासह वरिष्ठ वनाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर साहाय्यक वनसंरक्षकांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दरम्यान वनरक्षक संदीप वाटेकर यांच्यावर चाकूहल्ला झाल्याची घटना काल बुधवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची तक्रार पोलिसात देण्यात आली असून या खुनी हल्ल्यातील गुंडांचा शोध व वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांचा या हल्ल्यात हात आहे कां ? याबाबात तपास सुरू आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी एम. पी. राठोड यांची यापूर्वीची सावली व बफर झोन क्षेत्रातील कारकीर्द अत्यंत वादग्रस्त राहिली असून, अनेक अधिनस्थ कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडून त्रास देण्यात आला आहे. याबाबतच्या तक्रारीसुद्धा अनेकदा करण्यात आल्या असल्या तरी राठोड नावांच्या मंत्र्यांचा धाक दाखवून सावरासावर केल्या गेली. कोलाम नामक वनपालाने काही महिन्यांपूर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती असून वरोरा वनपरिक्षेत्रातही राठोड यांचा हा प्रकार सुरू आहे, १४ सप्टेंबर रोजी टेमुर्डा येथील वनपालाच्या कार्यालयात वनरक्षक संदीप वाटेकर यांना शिविगाळ करून चाकूने भोसकण्याची धमकी दिली होती. आरएफओच्या या कृत्याविरोधात वनरक्षक व वनपालांच्या संघटना मैदानात उतरल्या असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी रेटून धरली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस व वरिष्ठ वनाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीत स्वतःच्या जीविताला व कुटूंबाला धोका असल्याचेही वाटेकर यांनी नमूद केले होते. त्यातच बुधवारी रात्री वनरक्षक वाटेकर रुग्णालयातून घरी जात असताना खांजी वार्डातील निर्मनुष्य असलेल्या रस्त्यावर पल्सर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी वाटेकर यांना अडविले. त्यानंतर नाव विचारले असता संदीप वाटेकर हे नाव सांगताच एकाने नाकावर बुक्की मारली व दुसऱ्याने चाकूने वार केले. परंतु, संदीप वाटेकर यांनी प्रसंगावधान राखून वेळीच चाकू हाताने अडविला. त्याचवेळी दुसरे वाहन रस्त्याने येत असल्याचे दिसताच आरोपी पळून गेले. यामध्ये वाटेकर यांच्या हाताला, नाकाला आणि डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस स्टेशन मधे तक्रार दिली, त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, आरएफओ राठोड यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने हा हल्ला घडवून आणल्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलीस त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवीत असल्याची माहिती आहे.

Previous articleधक्कादायक :-वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांचा पूर्व इतिहास धक्कादायक ?
Next articleसालोंरी गावाच्या आमसभेत घरकुल प्रश्नासोबतच इतर ज्वलंत प्रश्न समाविष्ठ करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here